पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. लडाखमधील प्रमुख शहर असलेल्या लेह येथे आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणावर जाळपोळ करण्यात आली. या दरम्यान, झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७० जण जखमी झाले आहेत.
लडाखला पूर्ण राज्याच्या दर्जासह इतर मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आणि स्थानिक लोकांनी केंद्र सरकार आणि प्रशासनाविरोधात बंदचं आवाहन केलं होतं. तसेच लेह येथे शांततामय मार्गाने आंदोलन सुरू होतं. मात्र हे आंदोलन अचानक हिंसक झालं. तसेच पोलिसांसोबत झालेल्या वादावादीनंतर तणाव निर्माण झाला. संतापलेल्या जमावाने सीआरपीएफच्या वाहनांसह पोलिसांच्या गाड्यांनाही आग लावली. एवढंच नाही तर हिंसक जमावाने भाजपाच्या कार्यालयावरही हल्ला करून जाळपोळ केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये भाजपाचं कार्यालय जळताना दिसत आहे.
दरम्यान, लडाखमध्ये सुरू झालेल्या या आंदोलनामधील आंदोलकांच्या लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, लडाखला आदिवासी राज्याचा दर्जा मिळावा, सरकारी नोकरीत स्थानिकांना आरक्षण आणि लेह व कारगिल या दोन लोकसभा मतदारसंघांची निर्मिती करावी या चार प्रमुख मागण्या आहेत. लडाखमधील लोकांना नोकरीच्या अधिकाधिक संधी मिळाव्यात. तसेच स्थानिकांना आदिवासींचा दर्जा देण्यात यावा, अशी आंदोलकांची मागणी आहे.