वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 06:07 IST2025-08-28T06:06:16+5:302025-08-28T06:07:21+5:30
Supreme Court News: गुन्हेगारी खटले वर्षानुवर्षे प्रलंबित राहणे हीच एक मोठी शिक्षा आहे. निकालाची सततची प्रतीक्षा ही आरोपीसाठी मानसिक तुरुंगवास ठरते, अशी खंत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली.

वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
नवी दिल्ली - गुन्हेगारी खटले वर्षानुवर्षे प्रलंबित राहणे हीच एक मोठी शिक्षा आहे. निकालाची सततची प्रतीक्षा ही आरोपीसाठी मानसिक तुरुंगवास ठरते, अशी खंत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली. ३०० रुपयांच्या लाचेचे प्रकरण २२ वर्षे कोर्टात चालू होते, हे विशेष.न्या. एन.व्ही. अंजारिया व ए. एस. चंदूरकर यांच्या खंडपीठाने ही महत्त्वपूर्ण टिप्पणी करीत २२ वर्षे जुना भ्रष्टाचाराचा खटला निकाली काढला. आरोपी महिला आता ७५ वर्षांची विधवा असून, तिने ३१ दिवस तुरुंगवास भोगला आहे.
प्रतीक्षा ही मानसिक शिक्षाच
खंडपीठाने म्हटले, एखादी व्यक्ती दोषसिद्धी विरोधात अपील दाखल करून निकालाची वाट पाहते, तेव्हा ती दररोज अनिश्चिततेत जगते. हे त्या व्यक्तीच्या मानसिक स्वातंत्र्यावर गदा आणणे आहे. हीच एक प्रकारची शिक्षा ठरत आहे. खटले दीर्घकाळ चालतात. त्यामुळे खटला संपेपर्यंतच आरोपी मानसिक छळ सहन करीत असतो.
३०० रुपयांची लाच, निकाल यायला लागली २२ वर्षे
सप्टेंबर २००२ : केंद्रीय उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक असलेल्या महिलेवर ३०० रुपये लाचेची मागणी केल्याचा आरोप. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद.
२००७ मध्ये ट्रायल कोर्टाचा निकाल: आरोप सिद्ध मानून १ वर्ष कारावास व
दंडाची शिक्षा सुनावली.
ऑगस्ट २०१० मद्रास हायकोर्टचा निकाल: सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवत उच्च न्यायालयाने दोषसिद्धी मान्य केली. आरोपीचे सर्वोच्च न्यायालयात अपील.
२०१०-२०२४ : खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित.
२१ ऑगस्ट २०२४ सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दोषसिद्धी कायम ठेवली. शिक्षा कमी करून 'भोगलेला ३१ दिवसांचा तुरुंगवास पुरेसा' असे मानले. दंडात २५,००० रुपयांची वाढ केली. ३०० रुपयांच्या लाचेच्या प्रकरणाचा निकाल यायला लागली २२ वर्षे