नवी दिल्लीः काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचा फोन हॅक झाल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. इस्राएली कंपनीनं हेरगिरीच्या कारणास्तव प्रियंका यांचा फोन हॅक केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून होत असलेल्या हेरगिरीत मोदी सरकारचा हात आहे. फोन हॅक होण्याच्या आधी संबंधित व्यक्तीला व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवण्यात येतो. प्रियंका गांधींनाही अशाच प्रकारचा मेसेज आला होता, असं म्हणत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपावर थेट निशाणा साधला आहे. 'अबकी बार जासूसी सरकार' आणि भाजपाचे नवे नाव 'भारतीय जासूसी पार्टी' असं म्हणत त्यांनी मोदींनाही टोला लगावला आहे.
पत्रकार, नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअॅपवरील हेरगिरीमागे केंद्राचा हात असल्याचा काँग्रेसला दाट संशय आहे. कारण पिगॅसस सॉफ्टवेअर हे सरकारच्या परवानगीशिवाय विकता येत नाही. तसेच ते अन्य कुणालाही विकता येत नाही, असा आरोपही काँग्रेसनं केला आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पिगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पत्रकार, नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन हॅक केल्याची प्रकरणं समोर आली आहेत, याची आठवणही सुरजेवालांनी करून दिली आहे.
जगात 1400 ग्राहकांची इस्राएलच्या पिगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हेरगिरी करण्यात येत असल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेसनं केला आहे. यात भारतातील अनेक पत्रकार, नेते सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनीही केंद्र सरकारवर शनिवारी हेरगिरीचा आरोप केला होता. पिगॅसस सॉफ्टवेअरद्वारे कोणकोणते इंटरनेट, ब्रॉडबँड नेटवर्क करप्ट केले, याची माहिती काँग्रेसला आहे. या हेरगिरीत सर्वोच्च न्यायालयापासून ते खासदार, राज्य सरकारांची यंत्रणाही पिगॅसस सॉफ्टवेअरद्वारे हॅक करता येते.
Web Title: Priyanka Gandhi Vadra's Phone Hacked Through WhatsApp Spyware: Congress
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.