'राहुल गांधी संविधानासाठी लढतात, म्हणून सरकार त्यांना घाबरते', प्रियांका गांधींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 20:11 IST2025-01-21T20:11:27+5:302025-01-21T20:11:46+5:30
Priyanka Gandhi : '2024 च्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने भाजपला धडा शिकवला, त्यामुळे मोदीजी घाबरले.'

'राहुल गांधी संविधानासाठी लढतात, म्हणून सरकार त्यांना घाबरते', प्रियांका गांधींची टीका
Priyanka Gandhi :काँग्रेस खासदार प्रियांका गांधींनी मंगळवारी(21 जानेवारी) भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार टीका केली. भाजप आणि आरएसएसची भ्याड विचारधारा आहे, असा आरोप त्यांनी केला. जय बापू, जय भीम, जय संविधान रॅलीला संबोधित करताना प्रियंकांनी दावा केला की, राहुल गांधी संविधानासाठी लढत असल्याने केंद्र सरकार त्यांना घाबरते. देशासाठी बलिदान देण्याचा विचार काँग्रेसच्या मनात आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
कर्नाटकातील बेळगावी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, संविधान हे फक्त पुस्तक नसून, लोकांचे संरक्षण कवच आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीचा त्यात समावेश केला. बाबासाहेब सामाजिक न्याय आणि हक्काचे प्रतीक आहेत. अनेक सरकारे आली आणि गेली, पण असे एकही सरकार आले नाही, ज्यांच्या गृहमंत्र्यांनी संसदेत बाबासाहेबांचा अपमान केला असेल, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
LIVE: Jai Bapu, Jai Bhim, Jai Samvidhan Maha Rally | Belagavi, Karnataka.https://t.co/OKHgG618IA
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) January 21, 2025
या विचारसरणीने संविधानाच्या विरोधात प्रचार केला
प्रियांका गांधी पुढे म्हणाल्या, स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही, अशी वक्तव्ये केली जातात, याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. संविधान बनवतानाही आरएसएसच्या विचारसरणीने अपमान केला होता. या विचारसरणीने संविधानाच्या विरोधात मोहीम उघडली होती. देशाच्या गृहमंत्र्यांनी बाबासाहेबांचा आणि लोकशाहीचा अपमान केला आहे. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांचा अपमान झाला आहे.
सरकार राहुल गांधींना घाबरते
2024 च्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने भाजपला धडा शिकवला, त्यामुळे मोदीजी घाबरले. निवडणुकीनंतर संसदेत गेल्यावर त्यांनी लगेच संविधानाला अभिवादन केले. पण, राहुल गांधी रोज संविधानासाठी लढतात. यासाठी ते प्राणाची आहुती देण्यास तयार आहेत. त्यामुळेच हे सरकार राहुल गांधींना घाबरते. त्यांना पाहून सरकार थरथर कापते, अशी टीकाही प्रियंकांनी यावेळी केली.