‘१९८४’ लिहिलेली बॅग देणाऱ्या भाजपा खासदारावर प्रियंका गांधी संतापल्या, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 18:22 IST2024-12-21T18:21:31+5:302024-12-21T18:22:43+5:30
Priyanka Gandhi News: काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रियंका गांधी यांनी पॅलेस्टाइन, बांगलादेश आदि मुद्द्यांचा उल्लेख असलेल्या बॅगा सोबत आणत सर्वांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अशाच प्रिंटेड बॅगेवरून प्रियंका गांधी आणि भाजपा खासदार आमने सामने आल्याचं दिसून आलं.

‘१९८४’ लिहिलेली बॅग देणाऱ्या भाजपा खासदारावर प्रियंका गांधी संतापल्या, म्हणाल्या...
संसदेचं यावेळचं हिवाळी अधिवेशन कमालीचं वादळी ठरलं. दरम्यान, अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात संविधानावरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून विरोधक आक्रमक झाले होते. तर दुसरीकडे काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रियंका गांधी यांनी पॅलेस्टाइन, बांगलादेश आदि मुद्द्यांचा उल्लेख असलेल्या बॅगा सोबत आणत सर्वांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अशाच प्रिंटेड बॅगेवरून प्रियंका गांधी आणि भाजपा खासदार आमने सामने आल्याचं दिसून आलं.
संसदेतील मकर द्वारावर प्रियंका गांधी आणि भाजपा खासदार अपराजिता सारंगी यांच्यात खडाजंगी झाल्याचं दिसून आलं. भाजपा खासदार अपराजिता सारंगी यांनी प्रियंका गांधी यांना १९८४ लिहिलेली बॅग देण्याचा प्रयत्न केला. त्यावरून प्रियंका गांधी भडकल्या. ‘’हे माझ्यासोबत करू नका’’, असा इशाराही प्रियंका गांधी यांनी यावेळी अपराजिता सारंगी यांना दिला. अपराजिता सारंगी ह्या प्रियंका गांधी यांना जी बॅग देऊ इच्छित होत्या. त्या बॅगवर १९८४ लिहिलेले होते. १९८४ साली झालेल्या शीख हत्याकांडाशी त्याचा संदर्भ होता.
प्रियंका गांधी आणि अपराजिता सारंगी लोकसभेमध्ये प्रवेश करत असताना ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत असून, त्यामधून अपराजिता सारंगी यांनी प्रियंका गांधी यांना अचानक बॅग द्यायचे ठरवले होते, असे दिसत आहे. प्रियंका गांधी यांनी सुरुवातीला ही बॅग स्वीकारली. सारंगी यांचे आभारही मानले. मात्र जेव्हा त्यावरील उल्लेख वाचला तेव्हा मात्र त्या भडकल्या. तसेच सारंगी यांना सक्त शब्दात ताकिद दिली.
काही दिवसांपूर्वी प्रियंका गांधी ह्या पॅलेस्टाईन आणि बांगलादेशबाबत संदेश लिहिलेल्या बॅग घेऊन सभागृहात आल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून अपराजिता सारंगी यांनी हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे. प्रियंका गांधी ह्या ही बॅग घेऊन जात असनाता सारंगी यांनी त्यांना १९८४ हा सुद्धा एक मुद्दा आहे. तसेच तोसुद्धा प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला पाहिजे, असे सांगितले होते.