एअर इंडियाचे खासगीकरण कमी कालावधीमुळे चालू आर्थिक वर्षात पूर्ण होणे अशक्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 07:03 IST2020-12-21T00:47:16+5:302020-12-21T07:03:25+5:30
Air India : या बोलींना कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनने पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.

एअर इंडियाचे खासगीकरण कमी कालावधीमुळे चालू आर्थिक वर्षात पूर्ण होणे अशक्य
नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षामध्ये एअर इंडियाच्या खासगीकरणाची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
ज्या कोणाची बोली मान्य होईल, त्याला उर्वरित संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कमी काळ राहणार असल्यामुळे ही प्रक्रिया पुढील आर्थिक वर्षामध्ये जाण्याची शक्यता आहे. एअर इंडियाच्या खासगीकरणासाठी सरकारने बोली आमंत्रित केल्या होत्या. या बोलींना कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनने पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. १५ डिसेंबरपर्यंत बोली लावण्याची मुदत होती. त्यामुळे बोली मंजूर झाल्यावर अन्य सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांहून कमी कालावधी मिळणार आहे. एवढ्या कमी कालावधीमध्ये संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणे शक्य नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. येत्या ६ जानेवारीला पात्र बोली लावणाऱ्यांची यादी जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर सर्वांना एअर इंडियावर असलेले कर्ज आणि अन्य सर्व आर्थिक बाबींची माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर आर्थिक बोली लावली जाणार आहे. एअर इंडियाच्या २००हून अधिक कर्मचाऱ्यांनी इंटरअप्सच्या साथीने एअर इंडियाच्या खरेदीची तयारी दाखविली आहे.