बंदिवानांचेही ‘जय श्रीराम’! ५१ हजार दिवे, ४० हजार रामध्वज; राम मंदिर सोहळ्यात खारीचा वाटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 10:17 IST2024-01-19T10:17:09+5:302024-01-19T10:17:25+5:30
Ayodhya Ram Mandir News: रामकार्यात आपलेही काही योगदान असावे, या भावनेतून कैद्यांनी विविध वस्तू तयार करून अयोध्येला पाठवल्या आहेत.

बंदिवानांचेही ‘जय श्रीराम’! ५१ हजार दिवे, ४० हजार रामध्वज; राम मंदिर सोहळ्यात खारीचा वाटा
Ayodhya Ram Mandir News: श्रीराम मंदिराच्या गर्भगृहात रामललाची मूर्ती आसनावर विधिवत पद्धतीने ठेवण्यात आली. त्यानंतर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सुरू असलेल्या विधींपैकी एक असलेला गणेशपूजन, वरुणपूजा, जलाधिवास विधी पार पडला. अवघ्या काही तासांवर राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आला आहे. या सोहळ्यासाठी आपलेही काही योगदान असावे, या भावनेतून देशवासी काही ना काही खारीचा वाटा उचलत आहेत. उत्तर प्रदेशमधील विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनी राम मंदिर सोहळ्यासाठी योगदान दिले आहे.
श्रीराम मंदिर सोहळ्याच्या तयारीसाठी प्रत्येकजण आपापल्या क्षमतेनुसार योगदान देत आहेत. केवळ भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही या राम मंदिरासाठी, प्रभू श्रीरामांसाठी वैविध्यपूर्ण गोष्टी पाठवण्यात येत आहेत. राम मंदिर सोहळ्यासाठी या वस्तू अयोध्येत पोहोचत आहेत. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी होणाऱ्या अभिषेकासाठी तेल-तुपापासून अनेक गोष्टी अयोध्येत पोहोचवल्या जात आहेत. राम कार्यासाठी आपलाही हातभार लागावा, अशी इच्छा देशवासीयांची आहे. यात कैद्यांनीही आपले योगदान दिले आहे.
५१ हजार दिवे, ४० हजार रामध्वज अयोध्येला पाठवले जाणार
उत्तर प्रदेशच्या ७५ जिल्हा कारागृहात बंदिस्त कैद्यांनी प्रभू श्रीरामांवरील श्रद्धेतून गोमयापासून ५१ हजार दिवे बनवले आहेत. हे सर्व दिवे अयोध्येला पाठवले जाणार आहेत. तसेच कानपूर, फतेहगड आणि इतर कारागृहातील कैद्यांनी रामध्वज तयार केले आहेत. या रामध्वजांची संख्या सुमारे ४० हजार असून, नोएडा तुरुंगातील कैद्यांनी एक हजार एलईडी दिवे तयार करून अयोध्येला पाठवले आहेत. बाराबंकी तुरुंगातील कैद्यांनी भगवी रामनामी झोळी तयार केली आहे.
दरम्यान, राम मंदिरात स्थापन होणाऱ्या रामलला मूर्तीची पहिली झलक समोर आली आहे. रामललाची मूर्ती गर्भगृहात दाखल झाली आहे. ती प्रतिष्ठापित (विराजमान) झालेली नाही. मूर्ती गर्भगृहात आसनावर ठेवण्यात आली. या प्रक्रियेला ४ तास लागले. यानंतर आता प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त औषधाधिवास, केसराधिवास, घृताधिवास आणि धान्याधिवास विधी पार पडणार आहेत. त्यानंतर शर्कराधिवास, फलाधिवास आणि पुष्पाधिवास हे विधी होणार आहेत.