सोमनाथाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्पण केला विशेष मराठी पाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 09:33 IST2026-01-13T09:32:27+5:302026-01-13T09:33:13+5:30
पाग अर्पण करणे हा भारतीय स्वाभिमान, सांस्कृतिक गौरव व नारीशक्तीचे प्रतीक आहे.

सोमनाथाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्पण केला विशेष मराठी पाग
सोमनाथ: सोमनाथ स्वाभिमान पर्वाप्रसंगी गुजरात दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ महादेवांना विशेष पाग अर्पण केला. सोमनाथ येथे शिवपूजेची अखंड परंपरा जिवंत ठेवण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांना आदरांजली म्हणून खास तयार करण्यात आलेला मराठी पाग विधीपूर्वक पूजन करून मोदी यांनी सोमनाथ महादेवांना अर्पण केला.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर या भारतीय नारीशक्ती, धैर्य आणि सामर्थ्याच्या आदर्श आहेत. हाच भाव व्यक्त करणारा हा पाग श्री सोमनाथ ट्रस्टशी संबंधित महिलांनी श्रद्धा, निष्ठा व समर्पणाने तयार केला आहे. पाग अर्पण करणे हा भारतीय स्वाभिमान, सांस्कृतिक गौरव व नारीशक्तीचे प्रतीक आहे.
हे आहे मराठी पागाचे महत्त्व
मराठी पागाचे महत्त्व केवळ पूजेपुरते मर्यादित नाही. पूजा व श्रृंगारानंतर पाग विधीपूर्वक उलगडून त्यातून प्राप्त झालेले पितांबर व साड्या गुजरातमधील विविध वृद्धाश्रम, दिव्यांग गृह तसेच आदिवासी जिल्ह्यांमधील गरजू लोकांना वितरित केल्या जातात.
पितांबरापासून तयार केलेल्या झळ्यांचेही वितरण करण्यात येते. आतापर्यंत २१,००० हून अधिक लाभार्थ्यांपर्यंत श्री सोमनाथ महादेवांचा वस्त्र-प्रसाद पोहोचला आहे.
सन्मान व गौरवाचे प्रतीक
तसेच चांदीच्या दागिन्यांचा या विशेष पागामध्ये २१ पितांबर कलात्मक वापर करण्यात आला आहे. भारतीय सनातन परंपरेत पाग हा सन्मान व गौरवाचे प्रतीक मानला जातो.
पंजाबची शीख पगडी, मराठी व गुजराती पगडी तसेच म्हैसूरची पेटा हे सर्व भारतीय सन्मानाची प्रतीके आहेत. एखादा भक्त सोमनाथाला पाग अर्पण करतो, तेव्हा तो आपली प्रतिष्ठा, गौरव महादेवांच्या चरणी अर्पण करतो. रक्षणासाठी महादेवाला प्रार्थना करतो.
पाग निर्मितीत वापरली जाते शून्य-कचरा संकल्पना
पाग निर्मितीत वापरले जाणारे अगदी सूक्ष्म दागिने, दोरे व सजावटीचे साहित्यही वाया जाऊ नये, या उद्देशाने त्यांचे तोरणे व सजावटीच्या वस्तूंमध्ये रूपांतर केले जाते. त्या वस्तू श्री सोमनाथ ट्रस्टच्या सुव्हेनियर स्टोअरमध्ये भाविकांसाठी उपलब्ध असतात.