बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 07:29 IST2025-11-15T07:28:32+5:302025-11-15T07:29:17+5:30
Bihar Assembly Election 2025 Result: बिहारप्रमाणेच पश्चिम बंगालमधूनही आम्ही ‘जंगलराज’ हटविणारच असे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी म्हणाले. ज्याप्रमाणे गंगा नदी बिहारमार्गे बंगालमध्ये पोहोचते, त्याप्रमाणे बिहारच्या विधानसभा निवडणुकांतील विजयाने पं. बंगालमधील भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा करून दिला आहे असेही त्यांनी सांगितले.

बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
नवी दिल्ली - बिहारप्रमाणेच पश्चिम बंगालमधूनही आम्ही ‘जंगलराज’ हटविणारच असे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी म्हणाले. ज्याप्रमाणे गंगा नदी बिहारमार्गे बंगालमध्ये पोहोचते, त्याप्रमाणे बिहारच्या विधानसभा निवडणुकांतील विजयाने पं. बंगालमधील भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा करून दिला आहे असेही त्यांनी सांगितले.
बिहारमधील विधानसभा निवडणुकांत एनडीएला मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांशीसंवाद साधला. ते म्हणाले की, बिहारच्या विधानसभा निवडणुकांतील विजयाने नवीन ‘एमवाय - महिला आणि युवा’ हा फॉर्म्युला दिला असून, जनतेने जंगलराजवाल्यांच्या सांप्रदायिक एमवाय फॉर्म्युल्याचा धुव्वा उडवला आहे. भारताला ‘लोकशाहीची जननी’ असल्याचा मान बिहारच्या भूमीमुळे मिळाला. याच भूमीने लोकशाहीवर हल्ले करणाऱ्यांना धूळ चारली आहे.
काँग्रेसकडे देशाच्या विकासासाठी कोणताही सकारात्मक कार्यक्रम नाही. त्या पक्षातील काही नेते आपल्यासोबत पक्षातील इतर सर्वांना बुडवत आहेत, असे उद्गार मोदी यांनी शुक्रवारी काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर या वेळी टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, खोट्यांचा सपशेल पराभव होतो व सत्य बाजू मांडणारे लोकांचा विश्वास जिंकतात, हे बिहार विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी दाखवून दिले आहे. बिहारमधील विजयाने जनतेचा निवडणूक आयोगावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. राजदची सत्ता असलेल्या जंगलराजमध्ये निवडणुकांमध्ये हिंसा ही सामान्य बाब होती, अशी टीकाही त्यांनी केली. पश्चिम बंगालमधूनही आम्ही ‘जंगलराज’ हटविणारच असे पंतप्रधान मोदी यांनी या वेळी सांगितले.
‘एसआयआर मोहिमेला युवकांचा मोठा पाठिंबा‘
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मतदारयाद्यांमध्ये असलेल्या त्रुटी काढून टाकण्याची एसआयआर मोहीम युवा मतदारांनी अतिशय गांभीर्याने घेतली. हे बिहार विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी दाखवून दिले आहे. या मोहिमेला युवा मतदारांनी मोठा पाठिंबा दिला. या राज्यातील निवडणुका सुरळीतपणे पार पडल्या. या निवडणुकांच्या व्यवस्थेचे काटेकोर नियोजन केल्याबद्दल त्यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले.
‘जंगलराज’ उल्लेखाचा मतदारांवर मोठा परिणाम
महिलांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक साहाय्यासह राज्य व केंद्राच्या कल्याणकारी योजनांचा संगम तसेच राजदच्या राजवटीतील ‘जंगल राज’ची सतत करून दिलेली आठवण या मुद्द्यांवर एनडीएच्या नेत्यांनी विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचारसभांमध्ये भर दिला.
या गोष्टीनेही बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये एनडीएला प्रचंड विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली आहे. पंतप्रधानांनी बिहार निवडणुकांत १३ प्रचारसभा घेतल्या. तसेच पाटण्यामध्ये एक भव्य रोड शो केला.
विकास, सुशासनामुळे एनडीएला मिळाले यश
बिहारमध्ये एनडीएला मिळालेला प्रचंड जनादेश हा विकास, महिलांची सुरक्षा, सुशासन आणि गरिबांच्या कल्याणासाठी केलेल्या कामांना जनतेने दिलेली मान्यता आहे. गेल्या ११ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या विकासासाठी मनापासून काम केले. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी राज्याला ‘जंगलराज’च्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच विधानसभा निवडणुकांत मोठा विजय मिळाला.
- अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
अशा प्रकारे मोदी होते प्रचारकार्यात सक्रिय
बिहार विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ ऑक्टोबरला समाजवादी नेता आणि भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांचे जन्मस्थळ समस्तीपूर येथे पहिली सभा घेतली. त्यांनी आपल्या भाषणांतून बिहारी अस्मितेला साद घातली.
३० ऑक्टोबरला मोदींनी मुजफ्फरपूर व छपरा, त्यानंतर नवादा, आरा येथे सभा घेतल्या. ३ नोव्हेंबरला त्यांनी कटीहार, सहरसा, ६ नोव्हेंबरला अररिया, भागलपूर ७ ला भभुआ, औरंगाबाद, ८ नोव्हेंबरला बेतिया, सीतामढी येथे प्रचारसभा झाल्या.
काँग्रेसला चोख उत्तर
चेन्नई : बिहारच्या जनतेने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीच्या खोट्या प्रचाराला आणि लोकशाही संस्थांना बदनाम करण्याच्या प्रयत्नांना जोरदार उत्तर दिले, असे एआयडीएमकेचे महासचिव एडप्पडी के. पलनीस्वामी यांनी शुक्रवारी म्हटले.