पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 19:01 IST2025-08-18T19:00:57+5:302025-08-18T19:01:35+5:30
विकसित होणाऱ्या कोणत्याही देशासाठी आत्मनिर्भरता हाच विकासाचा पाया आहे. जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशांवर जास्त अवलंबून असतो, तेव्हा त्याचे स्वातंत्र्य धोक्यात येते असं मोदींनी म्हटलं होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
नवी दिल्ली - अमेरिकेकडून भारतावर लावण्यात आलेल्या टॅरिफच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. टॉप इकोनॉमिक बॉडीची मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल. अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती आणि अमेरिकेकडून लावण्यात आलेला २५ टक्के टॅरिफ यावरून आर्थिक सल्लागार परिषदेत आढावा घेतला जाणार आहे. पंतप्रधान निवासस्थानी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह ७ केंद्रीय मंत्री या बैठकीत सहभागी होणार आहेत.
एकीकडे चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी आजपासून २ दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत त्यामुळे पंतप्रधानांनी बोलवलेल्या या बैठकीला महत्त्व आले आहे. एस जयशंकर रशिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी ही बैठक होत आहे. अमेरिकेसोबत बिघडलेल्या व्यापारी संबंधांमुळे भारत बीजिंग आणि मॉस्कोसोबत आपले संबंध वाढवण्यावर भर देत आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंवर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. त्याशिवाय रशियाकडून भारताने तेल खरेदी सुरूच ठेवली तर २७ ऑगस्टपासून हा टॅरिफ दुप्पट करून ५० टक्के करण्याचा इशारा दिला आहे. या टॅरिफमुळे दागिने, कपडे, बूटसारख्या ४० अब्ज अमेरिकन डॉलरच्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी वॉशिंग्टनहून नवी दिल्लीला येणाऱ्या व्यापारी शिष्टमंडळ भेटीला स्थगिती मिळाल्याने प्रस्तावित भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करार (BTA) वरील चर्चेचा सहावा टप्पा स्थगित करण्यात आला होता. ही चर्चा २५ ते २९ ऑगस्ट या काळात होणार होती. आता ही भेट पुन्हा नियोजित होण्याची शक्यता आहे असं एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. अमेरिका कृषी आणि दुग्धव्यवसाय यांसारखी संवेदनशील क्षेत्रे उघडण्यासाठी भारतावर दबाव टाकत आहे. मात्र भारत सरकार यासाठी स्पष्ट नकार देत आहे. जर असे झाले तर भारतातील छोटे शेतकरी आणि पशुपालकांच्या उत्पादनाला धोका निर्माण होण्याची भीती आहे.
दरम्यान, स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून स्वदेशीचा नारा दिला. भारताला सामर्थ्यवान, आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण बनवण्याची जिद्द, सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करण्याची आकांक्षा आणि देशाला नवीन युगात घेऊन जाण्याचा ठाम निर्धार मोदींनी व्यक्त केला. विकसित होणाऱ्या कोणत्याही देशासाठी आत्मनिर्भरता हाच विकासाचा पाया आहे. जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशांवर जास्त अवलंबून असतो, तेव्हा त्याचे स्वातंत्र्य धोक्यात येते. याचाच अर्थ दुसऱ्यांवर अवलंबून राहणे ही एक वाईट सवय आहे. ही सवय राष्ट्रासाठी खूप धोकादायक ठरू शकते असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.