नोटाबंदीचा निर्णय चुकीचा होता हे पंतप्रधान मोदींनी मोठ्या मनाने मान्य करावे - मनमोहन सिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 06:50 IST2017-11-07T04:58:37+5:302017-11-07T06:50:43+5:30
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी, झालेली चूक मोठ्या मनाने मान्य करून डळमळलेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी सर्वांचे सहकार्य घेण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे.

नोटाबंदीचा निर्णय चुकीचा होता हे पंतप्रधान मोदींनी मोठ्या मनाने मान्य करावे - मनमोहन सिंग
नवी दिल्ली : नोटाबंदीच्या वर्षपूर्तीचा ८ नोव्हेंबर हा दिवस सरकार ‘काळा पैसा विरोधी दिन’ आणि काँग्रेससह इतर विरोधक ‘काळा दिवस’ म्हणून पाळणार असताना, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी, झालेली चूक मोठ्या मनाने मान्य करून डळमळलेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी सर्वांचे सहकार्य घेण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे.
डॉ. सिंग म्हणाले की, नोटाबंदीवरून राजकारण आता बंद करावे, असे मला ठामपणे वाटते. राजकारणाहून देश मोठा मानून मोदी यांनी चूक मोठ्या मनाने कबूल करण्याची व अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सर्वांचे सहकार्य घेण्याची ही वेळ आहे. डॉ. सिंग म्हणाले की, या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर अनेक परींनी दुष्परिणाम झाला. त्यातही समाजाच्या दुर्बळ वर्गावर आर्थिक आकडेवारी दाखविते, त्याहून अधिक वाईट परिणाम झाला. यामुळे अर्थव्यवस्थेत आधीच असलेली विषमता आणखी वाढण्याची भीती आहे. नोटाबंदी हा महाविनाश करणारा आर्थिक निर्णय होता, हे सिद्ध झाले आहे.