"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 14:40 IST2025-11-08T14:39:27+5:302025-11-08T14:40:35+5:30
Revanth Reddy : आता यासंदर्भात भाष्य करताना, आपण सर्व धर्मांचा आदर करतो आणि धार्मिक स्थळी गेल्यानंतर तेथील परंपरेचा सन्मान करायला हवा, असे रेवंत रेड्डी यांनी म्हटले आहे.

"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
तेलंगणातील जुबली हिल्स विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान टोपी घातल्यावरून मुख्यमंत्री रेवंत रेड्डी सध्या निशाण्यावर आहेत. आता यासंदर्भात भाष्य करताना, आपण सर्व धर्मांचा आदर करतो आणि धार्मिक स्थळी गेल्यानंतर तेथील परंपरेचा सन्मान करायला हवा, असे रेवंत रेड्डी यांनी म्हटले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टोपी परिधान केली होती. असा दावाही त्यांनी यावेळी केला.
"...तर ती त्यांच्या विचारांची गरीबी आहे" -
रेवंत रेड्डी म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टोपी परिधान केली होती. मी त्यांचे फोटो पाठवेन. मोदीजींची भूमिका काय आहे, हे आधी केंद्रीय मंत्री बंडी संजय कुमार यांनी स्पष्ट करावे. बंडी संजय यंच्या विचारातच खोट आहे. मी त्यांना भाजप नेत्यांची टोपी घातल्याची माहती पाठवेन." तसेच, “जर भाजपला वाटत असेल की देशात मुस्लीम अल्पसंख्याक राहू नयेत, तर ती त्यांच्या विचारांची गरीबी आहे,” असेही रेड्डी म्हणाले.
“हिंदू आणि मुसलमान हे काँग्रेसचे दोन डोळे" - -
दरम्यान, “काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस” या वक्तव्यानंतर रेड्डी यांच्यावर मुस्लीम तुष्टिकरणाचे आरोप झाले आहेत. यावर बोलताना ते म्हणाले, आपण “हिंदू आणि मुसलमान हे काँग्रेसचे दोन डोळे असल्याचे बोललो होतो.” असे विधान केले होते. काँग्रेस पक्ष सर्व धर्मांना आणि देशातील 140 कोटी लोकांना समान मानतो. जेव्हा जेव्हा काँग्रेस सरकार सत्तेवर होता, तेव्हा तेव्हा अल्पसंख्याकांना योग्य प्रतिनिधित्व दिले आहे. यासाठी त्यांनी माजी राष्ट्रपती जाकिर हुसेन आणि सलमान खुर्शीद यांसारख्या नेत्यांचाही उल्लेख केला.