राष्ट्रीय जनता दलाचे माजी नेते आणि प्रॉपर्टी डिलर राजकुमार राय यांच्या हत्येमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी राय यांना भररस्त्यात गाठून त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. तसेच ते जीव वाचवण्यासाठी एका हॉटेलच्या दिशेने धावले असताना तिथेही त्यांच्यावर गोळ्या झाडत त्यांची हत्या केली. राजकुमार राय यांनी आरजेडीचा बालेकिल्ला असलेल्या राघोपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती, त्यामुळे आता या हत्येमागे काही राजकीय कटकारस्थान तर नाही ना, अशा चर्चांना सुरुवात झाली आहे.
राजकुमार राय हे वैशाली जिल्ह्यातील मीरमपूर येथील रहिवासी होते. राजकारण आणि जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय असे दोन्हीकडे ते सक्रीय होते. ते काही काळ आरजेडीचे जिल्हाध्यक्षही राहिले होते. हल्लीच ते पक्षापासून काहीसे दुरावले होते. तसेच त्यांनी यावेळी राघोपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती.
राघोपूर विधानसभा मतदारसंघातून आरजेडीचे नेते तेजस्वी यादव हे निवडणूक लढवतात. २०१५ आणि २०२० मध्ये तेजस्वी यादव इथून विजयी झाले होते. तत्पूर्वी लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी यांनीही या मतदारसंघामधून निवडणूक लढवलेली होती. त्यामुळे राजकुमार राय यांच्या सक्रियतेमुळे आरजेडीची समिकरणं बिघडण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळेच या हत्येकडे राजकीय कटकारस्थान म्हणून पाहिले जात आहे.
जर राजकुमार राय हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असते तर मतांची विभागणी झाली असती. तसेच याचा फटका आरजेडीला बसण्याची शक्यता होता. त्याचं कारण म्हणजे आरजेडीचे परंपरागत मतदार असलेल्या भागातच राजकुमार राय यांचा चांगला जनाधार होता. अशा परिस्थितीत राजकुमार राय यांनी निवडणूक लढवली असती तर त्यामुळे आरजेडीचं नुकसान होऊन भाजपा-जेडीयू आघाडीला फायदा झाला असता.
राजकुमार राय यांच्या हत्येमुळे येणारी विधानसभा निवडणूक ही केवळी विकास आणि जातीय समीकरणांवरच नाही तर गुन्हेगारी आणि राजकीय कटकारस्थानांवरूनही लढवली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. आता राजकुमार राय यांची हत्या ही काही व्यावसायिक वादातून झाली की त्यामागे काही राजकीय कटकारस्थान आहे, याचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.