भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 12:40 IST2025-11-08T12:38:08+5:302025-11-08T12:40:04+5:30
अटकेनंतर ATS ने त्याच्या मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसची तपासणी केली, ज्यातून पाकिस्तानशी असलेले संपर्क समोर आले.

भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
लखनऊ - अलीकडेच एटीएसने सहारनपूर येथून दहशतवादी बिलालला अटक केली. तेव्हापासून त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्या चौकशीतून अनेक महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत. बिलाल पाकिस्तानमधील अल कायदाच्या हँडलर्ससह सुमारे ४,००० नंबरशी संपर्कात होता असे समोर आले आहे. पाकिस्तानी हँडलर्स त्याला दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन करण्याबाबत सतत सूचना पाठवत होते. तो सोशल मीडियावर जिहादी प्रचार पसरवत होता. चौकशीनंतर दहशत पसरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक सोशल मीडिया अकाउंट्सची माहिती देखील जमा करण्यात आली आहे.
सहारनपूरचा रहिवासी बिलाल हा अल-कायदाच्या मदतीने भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होता. त्याला १५ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) अटक केली. ४ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या रिमांड कालावधीत एटीएसने बिलालच्या चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. एटीएस सध्या बिलालच्या मोबाईल डेटाची पडताळणी करत आहे. बिलालने सरकार अस्थिर करण्यापासून शरिया कायदा लागू करण्याबद्दल बोलल्याचेही समोर आले आहे. शिवाय, त्याने ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा उल्लेख "शहीद" असा केला.
बिलालने त्याच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये पहिला AQIS प्रमुख असीम उमर याला श्रद्धांजली वाहिली. त्याने असीम उमरला त्याच्या ग्रुप सदस्यांसाठी हिरो म्हणून वर्णन केले. जर तुम्ही जिहादचा मार्ग अवलंबला तर मोरोक्कोपासून फिलीपिन्सपर्यंत मुजाहिदीन तुमच्या समर्थनात उभे राहतील. जिथे मुजाहिदीन घाम गाळतील तिथे लोक रक्त सांडतील असं तो युवकांना भडकावत होता. उत्तर प्रदेश अँटी-टेररिस्ट स्क्वॉड (ATS) ने १५ सप्टेंबर २०२५ रोजी सहारनपूर येथून बिलाल खानला अटक केली. ही अटक AQIS च्या भारतातील दहशतवादी नेटवर्कशी संबंधित मोहिमेचा भाग होती. अटकेनंतर ATS ने त्याच्या मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसची तपासणी केली, ज्यातून पाकिस्तानशी असलेले संपर्क समोर आले.
बिलालच्या फोनमधून ४,००० हून अधिक पाकिस्तानी नंबरांशी संपर्क सापडला. यापैकी अनेक नंबर AQIS च्या पाकिस्तानातील हँडलर्सचे होते, ज्यांच्याशी तो नियमित बोलत असे. पाकिस्तानातील हँडलर्सच्या सूचनेनुसार भारतात हिंसक जिहादची मोहिम राबवण्याची तयारी. यात सोशल मीडियाद्वारे भरती घेणे, उत्तर प्रदेशात दहशतवादी प्रशिक्षण देणे आणि भारतविरोधी हल्ल्यांची योजना समाविष्ट होती. बिलालने उत्तर प्रदेशात तरुणांना दहशतवादी संघटनेत भरती करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला होता. ATS ने त्याच्या नेटवर्कमधील इतर संशयितांवरही कारवाई सुरू केली आहे. सध्या या प्रकरणात अजून चौकशी सुरू असून आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.