Maha Kumbh Stampede : १९५४ मध्ये झाली होती सर्वात मोठी चेंगराचेंगरी; महाकुंभ मेळाव्यात कधी-कधी घडली दुर्घटना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 14:29 IST2025-01-29T14:21:31+5:302025-01-29T14:29:26+5:30

Prayagraj Mahakumbh Stampede : कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या घटना कधी घडल्या होत्या, त्याबद्दल जाणून घ्या... 

Prayagraj Mahakumbh Stampede : maha kumbh 2025 mauni amavasya stampede 1954 several people died in a stampede at prayagraj  | Maha Kumbh Stampede : १९५४ मध्ये झाली होती सर्वात मोठी चेंगराचेंगरी; महाकुंभ मेळाव्यात कधी-कधी घडली दुर्घटना?

Maha Kumbh Stampede : १९५४ मध्ये झाली होती सर्वात मोठी चेंगराचेंगरी; महाकुंभ मेळाव्यात कधी-कधी घडली दुर्घटना?

Prayagraj Mahakumbh Stampede : प्रयागराज : महाकुंभमेळाव्यात आज मौनी अमावस्येला अमृत स्नान करण्यासाठी संगम किनाऱ्यावर मोठ्या संख्येने भाविक आले. यावेळी मंगळवारी रात्री चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा मानल्या जाणाऱ्या कुंभमेळ्यातील इतिहासात अनेकदा चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या घटना कधी घडल्या होत्या, त्याबद्दल जाणून घ्या... 

भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा पहिला कुंभमेळा हा १९५४ चा कुंभमेळा होता. ३ फेब्रुवारी १९५४ ला मौनी अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर पवित्र स्नान करण्यासाठी अलाहाबाद (आता प्रयागराज) येथील कुंभमेळ्यात मोठ्या संख्येने भाविक जमले होते. त्यावेळी चेंगराचेंगरी झाली होती. या चेंगराचेंगरीत जवळपास ८०० लोकांचा मृत्यू झाला होता. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, १९८६ मध्ये कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये किमान २०० जणांना आपला जीव गमवावा लागला. 

१९८६ मध्ये कुंभमेळ्यात उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वीर बहादूर सिंह हे अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि खासदारांसह हरिद्वारला पोहोचले, तेव्हा ही चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली होती. त्यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सामान्य लोकांना संगम किनाऱ्यावर जाण्यापासून रोखले, त्यावेळी गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरीची घटना घडली. यानंतर २००३ मध्येही अशीच एक दुर्दैवी घटना घडली होती. 

२००३ मध्ये नाशिक येथे कुंभमेळ्यादरम्यान गोदावरी नदीत पवित्र स्नानासाठी हजारो भाविक एकत्र आले. त्यावेळी चेंगराचेंगरी झाली होती. या चेंगराचेंगरीत महिलांसह किमान ३९ जणांचा मृत्यू झाला आणि १०० हून अधिक जण जखमी झाले होते. यानंतर २०१३ मध्ये उत्तर प्रदेशातील अलाहाबाद (आता प्रयागराज) मध्ये कुंभमेळा पार पडला. त्यावेळी १० फेब्रुवारी २०१३ ला अलाहाबाद (आता प्रयागराज) रेल्वे स्थानकावर पादचारी पूल कोसळल्याने चेंगराचेंगरी झाली होती. यामध्येही ४२ जणांना आपला जीव गमवावा लागला तर ४५ जण जखमी झाले होते. 

या घटनेनंतर आता २०२५ मध्ये म्हणजेच आज, २९ जानेवारीला मौनी अमावस्येला अमृत स्नान करण्यासाठी संगम किनाऱ्यावर मोठ्या संख्येने भाविक आले. यावेळी मंगळवारी रात्री झालेल्या गर्दीमुळे याठिकाणी लावण्याते आलेले बॅरिकेड्स तुटले आणि एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले आहेत. तर दहा भाविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाने याला दुजोरा दिलेला नाही.

अफवांकडे लक्ष देऊ नका - योगी आदित्यनाथ
या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अफवांकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन भाविकांना केले आहे. भाविकांनी अफवांकडे लक्ष देऊ नये, केंद्र आणि राज्य सरकार पूर्ण ताकदीने सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. जर कोणी नकारात्मक अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला, तर त्यामुळे नुकसान होऊ शकते, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. तसेच, काही भाविक गंभीर जखमी झाले आहेत आणि सुरक्षित स्नान सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन सतत सक्रिय आहे. पहाटे १-२ वाजता भाविकांनी बॅरिकेड्स ओलांडून उड्या मारल्या. त्यावेळी ही घटना  घडली, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

कशी झाली दुर्घटना?
मौनी अमावस्येमुळे गंगा स्नान करण्यासाठी मंगळवारी रात्री २ वाजल्यापासून संगम किनाऱ्यावर भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यावेळी सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेड्स तुटले आणि एकच गोंधळ उडाला. त्यामुळे दोन्ही बाजूने चेंगराचेंगरी झाली. काही मिनिटांत परिस्थिती चिघळली. लोक जीव वाचवण्यासाठी धावू लागले. काही भाविकांचे सामान खाली पडले. त्यात लोक एकमेकांना मागे सारून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. गर्दी नियंत्रणातून बाहेर गेल्याने चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Prayagraj Mahakumbh Stampede : maha kumbh 2025 mauni amavasya stampede 1954 several people died in a stampede at prayagraj 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.