"सनातनसाठी थोडी पचनशक्ती वाढवा’’, जगदीप धनखड यांनी काँग्रेस खासदाराला दिला असा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 14:24 IST2025-02-10T14:23:21+5:302025-02-10T14:24:44+5:30
Prayagraj Mahakumbh 2025: प्रश्नोत्तराच्या तासावेळी काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी प्रयागराज येथील महागड्या विमान तिकिटांबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी त्यांना सनातनबाबतची पचनशक्ती वाढवण्याचा सल्ला दिला.

"सनातनसाठी थोडी पचनशक्ती वाढवा’’, जगदीप धनखड यांनी काँग्रेस खासदाराला दिला असा सल्ला
संसदचेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या साकव्या दिवशी राज्यसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासावेळा प्रयागराजच्या महागड्या विमान तिकीटांचा मुद्दा गाजला. प्रश्नोत्तराच्या तासावेळी काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी प्रयागराज येथील महागड्या विमान तिकिटांबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी त्यांना सनातनबाबतची पचनशक्ती वाढवण्याचा सल्ला दिला.
त्याचं झालं असं की, प्रमोद तिवारी यांनी प्रयागराज येथील महागड्या विमान तिकिटांचा प्रश्न उपस्थित करत सांगितलं की, दिल्लीपासून लंडनसाठीचं विमान भाडं वेळीच तिकीट खरेदी केल्यास २४ हजार रुपये आहे. मात्र सध्या चेन्नईवरून प्रयागराजला जाण्यासाठी ५३ हजार रुपये भाडं आहे. त्यावर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी सध्या प्रयागराजचं महत्त्व असल्यानं भाडं जास्त असल्याचं सांगितलं. तेव्हा प्रमोद तिवारी यांनी कोलकाता, दिल्ली, हैदराबाद येथून प्रयागराजसाठीच्या विमान तिकिटाचे दर वाचून सांगितले.
यावर सभापतींनी तुम्ही प्रीमियम तिकिटाचे दर सांगत आहात का? असं विचारलं तेव्हा प्रमोद तिवारी यांनी मी इकॉनॉमी तिकिटांबाबतच बोलत आहे, असे सांगितले. त्यावर जगदीप धनखड यांनी नेहमी असं होत नाही, असं सांगितलं. तेवव्हा प्रमोद तिवारी यांनी उत्तरदाखल सांगितलं की महाकुंभमुळे दर वाढलेले आहेत. तेव्हा सभापती म्हणाले की, तो तर १४४ वर्षांनंतर आला आहे.
प्रमोद तिवारी संतापून म्हणाले की, महाकुंभच्या नावावर जनतेच्या खिशावर दरोडा घातला जात आहे. हे सरकार आस्था आणि सनातनवर विश्वास ठेवते की... असे विचारत सरकार विमानाच्या दरांना सब्सिडाइज करणार का किंवा अधिकाधिक नेहमीपेक्षा दुप्पट तिकिटांच्या दराबाबत विचार करणार का? असा प्रश्न विचारला.
त्यावर सभापती जगदीप धनखड यांनी प्रमोद तिवारी यांना विचारलं की, तुम्ही प्रयागराजमधीलच रहिवासी आहात ना? तेव्हा तिवारी यांनी हो असं उत्तर दिलं. त्यानंतर जगदीप धनखड यांनी, सनातनसाठी थोडी पचनशक्ती वाढवा असा सल्ला प्रमोद तिवारी यांना दिला. तसेच मंत्री राममोहन नायडू यांना प्रमोद तिवारी यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्यास सांगितलं.
प्रमोद तिवारी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राममोहन नायडू यांनी सांगितले की, विमानांच्या तिकिटाचे दर हे मागणीवर अवलंबून असतात. सध्या प्रयागराज हे लंडनपेक्षा महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला प्रयागराज येथे जायंच आहे. १४४ वर्षांनंतर आलेला हा उत्सव केवळ हिंदूंसाठी नाही तर जगभरासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे जगभरातील लोकांना प्रयागराज येथे जायचं आहे.