YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:37 IST2025-12-19T12:37:04+5:302025-12-19T12:37:49+5:30
५ हजारांहून अधिक विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक पुरी-भाजी खाण्यासाठी पोहोचले, ज्यामुळे परिसरात प्रचंड गर्दी झाली.

फोटो - आजतक
प्रयागराज येथील 'सुपर क्लायमॅक्स एकॅडमी' या कोचिंग इन्स्टिट्यूटने YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा पूर्ण केल्याच्या आनंदात एका महाभंडाऱ्याचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात ५ हजारांहून अधिक विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक पुरी-भाजी खाण्यासाठी पोहोचले, ज्यामुळे परिसरात प्रचंड गर्दी झाली. गर्दी इतकी मोठी होती की, जवळपास दीड किलोमीटर लांब रांग लागली आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
परिस्थिती हाताळण्यासाठी कोचिंग क्लासच्या बाऊन्सर्सना आणि कर्मचाऱ्यांना हातात काठी घेऊन मैदानात उतरावं लागलं. जेवणाची मागणी प्रचंड असल्याने अनेक वेळा जेवण संपलं, जे पुन्हा तयार करून विद्यार्थ्यांना वाढण्यात आले. भंडाऱ्याची माहिती मिळताच विद्यार्थ्यांचा जनसागर लोटला, ज्यामुळे रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी आणि अव्यवस्था पसरली.
गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी संस्थेला स्वतःचे बाऊन्सर आणि कर्मचारी तैनात करावे लागले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनेक कर्मचारी हातात काठी घेऊन गर्दीला रांगेत उभे करताना दिसत आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या दोन-तीन वेगवेगळ्या रांगा करण्यात आल्या होत्या. या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
राजेश कुमार या विद्यार्थ्याने सांगितलं की, सबस्क्रायबर्स वाढल्याच्या आनंदात आयोजित केलेल्या या भंडाऱ्यात सहभागी होण्यासाठी तो तासनतास रांगेत उभा राहिला. गर्दी इतकी होती की, व्यवस्थापनाला मध्येच 'जेवण संपलं' अशी घोषणा करावी लागली, पण विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून पुन्हा जेवण बनवण्यात आलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.