तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 13:29 IST2026-04-07T13:28:52+5:302026-04-07T13:29:16+5:30
उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे भाजपाच्या एका कार्यक्रमादरम्यान पक्षाच्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये, माजी आमदार धीरज ओझा आणि माजी मंत्री शिवाकांत ओझा यांच्यात मोठा वाद झाला आहे.

तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे भाजपाच्या एका कार्यक्रमादरम्यान पक्षाच्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये, माजी आमदार धीरज ओझा आणि माजी मंत्री शिवाकांत ओझा यांच्यात मोठा वाद झाला आहे. हा वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही नेत्यांनी एकमेकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. यानंतर दोन्ही नेत्यांचे समर्थकही आपापसात भिडले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
प्रतापगडच्या दिलीपपूर येथे ही घटना घडली आहे, जिथे भाजपाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमादरम्यान माजी मंत्री शिवाकांत ओझा आणि माजी आमदार धीरज ओझा यांच्यात वाद सुरू झाला. वाद वाढत गेला आणि दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ करत ' एकमेकांना बघून घेण्याची' धमकी दिली. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.
वर्चस्वाच्या लढाईतून वाद
मिळालेल्या माहितीनुसार, राणीगंज विधानसभा मतदारसंघात शिवाकांत ओझा आणि धीरज ओझा यांच्यात वर्चस्व सिद्ध करण्याची स्पर्धा लागली आहे. यापूर्वीही माजी मंत्र्यांचा मुलगा आणि माजी आमदार धीरज ओझा यांच्यात वाद झाला होता. त्या प्रकरणी धीरज ओझा आणि त्यांच्या समर्थकांवर मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला होता.
भाजपामध्ये खळबळ
वादामुळे भाजपाच्या गोटात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया विचारली असता, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आशिष श्रीवास्तव यांनी कॅमेऱ्यासमोर काहीही बोलण्यास नकार दिला. मात्र, व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. आता या शिस्तभंग करणाऱ्या नेत्यांवर पक्ष नेतृत्व काय कारवाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याच दरम्यान शिवाकांत ओझा आणि धीरज ओझा या दोघांनीही या घटनेवर आपापल्या बाजूने स्पष्टीकरण दिले आहे.