प्रद्युम्न हत्या प्रकरण; कंडक्टर अशोकला जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 17:36 IST2017-11-21T17:34:49+5:302017-11-21T17:36:49+5:30
गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमधील चर्चित प्रद्युम्न हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या बस कंडक्टरला मंगळवारी जामीन मंजूर करण्यात आला. सोमवारी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता.

प्रद्युम्न हत्या प्रकरण; कंडक्टर अशोकला जामीन मंजूर
गुरूग्राम : गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमधील चर्चित प्रद्युम्न हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या बस कंडक्टरला मंगळवारी जामीन मंजूर करण्यात आला. सोमवारी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता. जिल्हा न्यायालयाने बस कंडक्टर अशोकला 50 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजुर केला. या प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपासून तो तुरूंगात बंद होता. त्याच्याविरोधात सीबीआय कोणताही पुरावा उपलब्ध करू शकली नाही.
प्रद्युम्न ठाकूर (वय 7 वर्ष) या दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची सप्टेंबरमध्ये हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी बस कंडक्टर अशोकला अटक केली होती. अशोकनेच प्रद्युम्नची हत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. अशोकने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र प्रद्युम्नच्या कुटुंबीयांनी मागणीनंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याता आला आणि प्रकरणाला कलाटणी मिळाली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी सीबीआयने अकरावीत शिकणाऱ्या मुलाला प्रद्युम्नच्या हत्ये प्रकरणी अटक केली.
काय आहे प्रकरण?
8 सप्टेंबर रोजी गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलच्या शौचालयात प्रद्युम्न ठाकूरची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी स्कूल बसचा कंडक्टर अशोक कुमारसह तीन जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी अशोक कुमारने हत्या केल्याची कबुली दिली होती. पण नंतर कोर्टात त्याने जबाब फिरवला. दबावात येऊन मी हत्या केल्याची कबुली दिली होती, असं अशोक कुमारने सांगितलं होतं.