प्रद्युम्न हत्या प्रकरण: अल्पवयीन आरोपीचा फेटाळला जामीन अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 14:25 IST2018-01-08T14:22:35+5:302018-01-08T14:25:29+5:30
गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७ वर्षांच्या प्रद्युम्न ठाकूर या मुलाच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या अल्पवयीन आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला.

प्रद्युम्न हत्या प्रकरण: अल्पवयीन आरोपीचा फेटाळला जामीन अर्ज
गुरगाव- गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रद्युम्न ठाकूर या मुलाच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या अल्पवयीन आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला. सोमवारी सकाळी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी अल्पवयीन मुलाचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने अल्पवयीन आरोपीला आता आणखी काही काळ बालसुधारगृहात राहावं लागणार आहे.
#PradyumanMurderCase: Bail application of the accused juvenile dismissed by #Gurugram sessions court.
— ANI (@ANI) January 8, 2018
अल्पवयीन आरोपी सध्या बालसुधार गृहात असून जामिनासाठी त्याने जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. आरोपी अल्पवयीन असून नियमानुसार अल्पवयीन आरोपीविरोधात एका महिन्यात आरोपपत्र दाखल करणं अपेक्षित असतं. मात्र, सीबीआयने अजूनही आरोपपत्र दाखल केलेलं नाही. त्यामुळे आरोपीला जामीन द्यावा, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात केला.सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे. या खटल्यातील पुढील सुनावणी २२ जानेवारी रोजी होणार आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात बाल हक्क न्यायालयाने अल्पवयीन आरोपीविरोधात सज्ञानाप्रमाणे खटला चालवावा, असे आदेश दिले होते.
रायन इंटरनॅशनल शाळेतील प्रद्युम्न ठाकूर या मुलाचा मृतदेह गेल्या वर्षी ७ सप्टेंबर रोजी शाळेच्या स्वच्छतागृहात सापडला होता. या प्रकरणी सीबीआयने याच शाळेत ११ वीत शिकणाऱ्या मुलाला अटक केली होती. पालक- शिक्षक बैठक आणि परीक्षा टाळण्यासाठी त्याने प्रद्युम्नची हत्या केल्याचे सीबीआयच्या तपासात समोर आलं.