खेळता खेळता लहान मुलांना सापडला 'खजिना'; चांदीची नाणी लुटण्यासाठी गावकऱ्यांची मोठी झुंबड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 17:27 IST2026-01-26T17:25:30+5:302026-01-26T17:27:31+5:30
काही मुलं एका पडक्या घरापाशी खेळत होती. खेळता खेळता त्यांची नजर भिंतीत असलेल्या एका हंड्यावर पडली आणि त्यांनी त्यातून नाणी काढायला सुरुवात केली.

AI फोटो
उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील अजनौरा गावात एका जुन्या घराच्या कच्च्या भिंतीत मुलांना नाण्यांनी भरलेला एक हंडा सापडला. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही नाणी १९२० पूर्वीची असून ती चांदी आणि ब्रॉन्झची आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ही नाणी जप्त केली आहेत. मात्र हंड्यातून नेमकी किती नाणी निघाली, याचा आकडा अद्याप समजू शकलेला नाही.
काही मुलं एका पडक्या घरापाशी खेळत होती. खेळता खेळता त्यांची नजर भिंतीत असलेल्या एका हंड्यावर पडली आणि त्यांनी त्यातून नाणी काढायला सुरुवात केली. मुलांच्या सांगण्यानुसार, हंड्यात खूप सारी नाणी होती. या घटनेची माहिती मिळताच घराशी संबंधित काही गावकरी तिथे पोहोचले आणि त्यांनी मुलांकडून नाणी हिसकावून घेतली. बघता बघता तिथे लोकांची मोठी गर्दी जमली आणि नाणी मिळवण्यासाठी एकच झुंबड उडाली.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पडकं घर 'लंबरदार बाबा' नावाच्या व्यक्तीचं होतं. त्यांना मुलं नव्हती आणि त्यांचे नातेवाईकही गेल्या अनेक वर्षांपासून तिथे वास्तव्यास नाहीत. या नाण्यांची नेमकी संख्या आणि त्यांचे ऐतिहासिक महत्त्व अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
या प्रकरणावर बोलताना अधिकारी कमल भाटी यांनी सांगितलं की, "गावकऱ्यांकडून आतापर्यंत चार पांढऱ्या धातूची आणि चार ब्रॉन्झची नाणी ताब्यात घेण्यात आली आहेत. हंड्यात एकूण किती नाणी होती, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. इतर नाण्यांबाबत अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे." सध्या गावात सापडलेल्या या खजिन्याची जोरदार चर्चा रंगली आहे.