डोक्याला १५ फ्रॅक्चर, यकृताचे ४ तुकडे, मान तुटली, हृदय फुटले... मुकेश चंद्राकर यांच्या शवविच्छेदन अहवालातून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 15:41 IST2025-01-06T15:38:32+5:302025-01-06T15:41:37+5:30
छत्तीसगडचे पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे.

डोक्याला १५ फ्रॅक्चर, यकृताचे ४ तुकडे, मान तुटली, हृदय फुटले... मुकेश चंद्राकर यांच्या शवविच्छेदन अहवालातून खुलासा
Mukesh Chandrakar Murder Case:छत्तीसगडमधील पत्रकार मुकेश चंद्राकर हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेश चंद्राकर याला एसआयटीच्या पथकाने हैदराबाद येथून अटक केली आहे. दुसरीकडे, हत्या झालेल्या मुकेश चंद्राकर यांचा शवविच्छेदन अहवाल देखील समोर आला आहे. या अहवालात त्यांच्यावर मृत्यूआधी करण्यात आलेल्या क्रूर अत्याचाराचे पुरावे समोर आले आहेत. शवविच्छेदनानंतर या हत्येत दोनहून अधिक जणांचा सहभाग असण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
छत्तीसगडमधील विजापूर येथील रहिवासी मुकेश चंद्राकर हे १ जानेवारीच्या रात्रीपासून बेपत्ता होते. यानंतर दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुकेश यांचा मृतदेह सेप्टिक टँकमधून बाहेर काढण्यात आला. मुकेश चंद्राकर यांनी कंत्राटदार सुरेश चंद्राकर यांच्याविरोधात रस्तेबांधणीतील भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यामुळे मुकेश यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यांचे शेवटचे ठिकाणही कंत्राटदाराने बांधलेले कंपाउंड होते. त्या कंपाऊडमधील सेप्टिक टँकमध्ये मुकेश यांचा मृतदेह हत्या करुन फेकण्यात आला होता.
शवविच्छेदनानुसार, मुकेशच्या यकृताचे चार तुकडे झाल्याचे समोर आलं आहे. त्यांच्या डोक्यात १५ फ्रॅक्चर आढळून असून त्यांचे हृदय फाटले आहे. तर मान मोडली असून पाच बरगड्या तुटल्या आहेत. तसेच शरीरावर गंभीर जखमांच्या खुणा आहेत. मुकेश चंद्राकार यांचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अशी घटना कधीच पाहिलेली नाही.
मुकेश यांचे शेवटेचे लोकेशन कंत्राटदार सुरेश चंद्राकार यांच्या कंपाउंडजवळ आढळले होते. त्यामुळे झडतीदरम्यान कंपाऊंडमध्ये काँक्रीट टाकल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्या सेप्टिक टँकचे प्लास्टर काढण्यास सुरुवात केली. त्यात मुकेशचा मृतदेह आढळून आला.
मुकेशचा भाऊ युकेश याने सांगितले की, तो १ जानेवारीला संध्याकाळी घरातून बाहेर पडला होता. काही वेळाने त्याचा फोन बंद होऊ लागला. २ जानेवारीच्या संध्याकाळी त्याचा फोन बंद झाल्यानंतर तो बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात होती. यानंतर युकेशने २ जानेवारीलाच पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. २४ डिसेंबर २०२४ रोजी मुकेश यांनी एका राष्ट्रीय वाहिनीसाठी एक रिपोर्ट तयार केला होता. या अहवालात आरोपी कंत्राटदाराविरुद्ध भ्रष्टाचार झाल्याची चर्चा होती. विजापूरमधील गांगलूर ते नेलशनार या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचाराचे आरोप मुकेश यांनी केले होते.