लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 18:37 IST2025-10-01T18:36:09+5:302025-10-01T18:37:06+5:30
'विविधतेत एकता’ ही भारताची आत्मा आहे. मात्र, जात, भाषा, प्रादेशिकता आणि अतिवादी विचारांनी प्रेरित विभाजनाचा सामना केला गेला नाही, तर देश कमकुवत होऊ शकतो,' अशी चिंताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
घुसखोरी आणि बाह्य शक्तींपेक्षाही मोठा धोका जनसांख्यिकी बदलाचा आहे. घुसखोरी आणि बाह्य शक्ती हे दीर्घकाळापासूनच देशाच्या एकतेसाठी आव्हान ठरले आहेत. मात्र, आज मोठे आव्हान आहे ते जनसांख्यिकी बदलाचे. कारण यामुळे सामाजिक समानता कमकुवत होत आहे. दसऱ्यापूर्वी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी देशवासियांना हा इशारा दिला आहे. ते 1 ऑक्टोबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्ष समारोहात बोलत होते.
'विविधतेत एकता’ ही भारताची आत्मा आहे. मात्र, जात, भाषा, प्रादेशिकता आणि अतिवादी विचारांनी प्रेरित विभाजनाचा सामना केला गेला नाही, तर देश कमकुवत होऊ शकतो,' अशी चिंताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मोदी म्हणाले, “सामाजिक समता म्हणजे वंचितांना प्राधान्य देऊन सामाजिक न्याय प्रस्थापित करणे आणि राष्ट्रीय एकता वाढवणे. आज जनसांख्यिकी बदल, अतिवादी विचार, क्षेत्रवाद, जाती-भाषा वाद आणि बाह्य शक्तींनी भडकावलेले विभाजन, अशी असंख्य आव्हाने आपल्या समोर आहेतत.” विविधतेत एकता हा भारताचा मूलमंत्र आहे, तो तुटला तर राष्ट्राची ताकद कमी होईल, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी त्यांनी RSS च्या शताब्दी निमित्ताने स्मारक डाक तिकीट जारी केले. ते म्हणाले, “RSS नेहमीच समाजाच्या विविध घटकांना सोबत घेऊन काम करतो. मात्र, ‘राष्ट्र प्रथम’ या सिद्धांतामुळे त्याच्या विविध शाखांमध्ये कधीही अंतर्विरोध होत नाही. 1925 मध्ये केशव बळिराम हेडगेवार यांनी RSS ची स्थापना सांस्कृतिक जागृती, शिस्त, सेवा, सामाजिक उत्तरदायित्व वाढवण्यासाठी केली.
मोदी म्हणाले, आरएसएस ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या विचारांवर विश्वास ठेऊन काम करते. स्वातंत्र्यानंतर संघाला मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न झाले, तरी तो राष्ट्राची अविरत सेवा करत आहे.