Richa Sachan Police Accident: पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करत असतानाच २५ वर्षीय रिचा सचान आयएएस होण्याची तयारी करत होत्या. पण, मंगळवारी रात्री एका भीषण अपघातात त्यांना जीव गमवावा लागला. मध्यरात्री ड्युटी संपून रिचा सचान बुलेटवरून घरी निघाल्या होत्या. अचानक कुत्रा बुलेटसमोर आला. रिचा यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि गाडीचे संतुलन बिघडले. त्या गाडीसह खाली पडल्या. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या भरधाव कारने त्यांना चिरडले.
गाजियाबाद शहरात सोमवारी (१८ ऑगस्ट) मध्यरात्री ही घटना घडली. कानपूरच्या असलेल्या रिचा सचान उत्तर प्रदेश पोलीस विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रूजू झाल्या. रिचा यांनी मेरठमध्ये मार्च २०२३ ते मार्च २०२४ प्रशिक्षण पूर्ण केले होते.
पहिलीच पोस्टिंग, आयएएसची तयारी
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रिचा यांना कविनगरमधील शास्त्रीनगर पोलीस ठाण्यात नियुक्ती मिळाली होती. रिचा सचान एकट्याच राहत होत्या. त्यांचं आयएएस होण्याचं स्वप्न होतं. त्यामुळे नोकरी करत त्या युपीएससीचीही तयारी करत होत्या.
रिचा सचान घरी निघाल्या पण...
रिचा सचान रात्री दोन वाजता ड्युटी संपवून घरी निघाल्या होत्या. त्या बुलेटवरून घरी जात असतानाच पोलीस ठाण्यापासून २०० मिटर अंतरावर मृत्यूने त्यांना गाठले. रिचा यांच्या बुलेटसमोर अचानक कुत्रा आला. त्याला वाचवण्याचा प्रयत्नात मोटारसायकलचे संतुलन बिघडले आणि त्या खाली कोसळल्या. त्याच वेळी पाठीमागून आलेल्या कारने त्यांना चिरडले.
या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील लोक उठले. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. रिचा यांना तातडीने सर्वोदय रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी रिचा यांच्या बुलेटची वेग प्रति तास ५० किमी इतकाच होता. रिचा यांनी हेल्मेटही घातलेले होते. पण, अपघातात त्याचाही चुराडा झाला.