राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 13:38 IST2025-11-06T13:23:29+5:302025-11-06T13:38:27+5:30
दसऱ्याच्या दिवशी चर्चेचा विषय ठरलेल्या कुंडाचे आमदार बाहुबली राजा भैया यांच्या शस्त्रांची पूजा करतानाच्या फोटो आणि व्हिडिओंवरील पोलिस तपास अहवाल समोर आला.

राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
दसऱ्या दिवशी उत्तर प्रदेशातील एक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये डझनभर शस्त्रांचे पूजन केल्याचे दिसत होते. या शस्त्रांबाबत आरोप-प्रत्यारोप झाले. या प्रकरणाची चौकशी लावण्यात आली, या शस्त्रांचे पूजन आमदार रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैया यांनी केले होते. शस्त्रपूजन समारंभाचा तपास अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या शस्त्रपूजनाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, माजी पोलिस महानिरीक्षक आणि अधिकार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमिताभ ठाकूर यांनी तक्रार दाखल करून शस्त्रांची चौकशी करण्याची मागणी केली होती. पोलिस अहवालात राजा भैया यांच्या बेंटी निवासस्थानी झालेल्या या शस्त्रपूजन समारंभाचे वर्णन पारंपारिक कार्यक्रम म्हणून केले आहे. अधिकाऱ्यांनी पोलिस पथकाला या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
अमिताभ ठाकूर यांनी राजा भैय्यांच्या शस्त्रपूजेचा व्हिडीओ पोलिस अधिकाऱ्यांना पाठवला. व्हिडिओमध्ये शेकडो शस्त्रे दिसत आहेत. कायदेशीर शस्त्रे असल्याचे सांगितले जात आहे, पण एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने शस्त्रे सार्वजनिकरित्या प्रदर्शित करणे याची अजूनही चौकशी झाली पाहिजे.
बेकायदेशीर कृत्यांचे पुरावे उघड झालेले नाहीत
अमिताभ ठाकूर यांच्या तक्रारीनंतर, प्रतापगडचे अतिरिक्त एसपी ब्रिजनंदन राय यांनी कुंडा सीओ अमरनाथ गुप्ता यांच्याकडून चौकशीची सूत्रे हाती घेतली. तपास अहवाल आता प्रसिद्ध झाला आहे. राजा भैया गेल्या ३० वर्षांपासून बेंटी आवास येथील प्राचीन हनुमान मंदिराच्या प्रांगणात विजयादशमीला शस्त्रपूजन कार्यक्रम आयोजित करत आहेत. राजा भैया यांचे आजोबा, दिवंगत राय बजरंग बहादूर सिंह आणि त्यांचे वडील उदय प्रताप सिंह यांनीही हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी कोणत्याही शस्त्रांचे प्रदर्शन, सराव, घोषणाबाजी, बेकायदेशीर शस्त्रे किंवा बेकायदेशीर कृत्यांचे पुरावे उघड झालेले नाहीत, असे तपास अहवालात म्हटले आहे.
हा कार्यक्रम पारंपारिकपणे एका खाजगी निवासी संकुलाच्या भिंतींमध्ये शांततेत पार पडतो. स्थानिक जनतेने या कार्यक्रमाला कोणताही आक्षेप किंवा विरोध व्यक्त केलेला नाही, तसेच शांतता आणि सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकेल अशी कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. अतिरिक्त एसपींनी सीओ कुंडा आणि निरीक्षक हथीगनवा यांना या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आणि काही तथ्य आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, असे तपास अहवालात असे म्हटले आहे.