करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 18:06 IST2025-09-29T18:06:13+5:302025-09-29T18:06:47+5:30
Karur Stampede: तामिळनाडूतील करूर येथे शनिवार २७ सप्टेंबर रोजी अभिनेता आणि टीव्हीके या राजकीय पक्षाचा नेता विजय याच्या झालेल्या सभेवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.

करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
तामिळनाडूतील करूर येथे शनिवार २७ सप्टेंबर रोजी अभिनेता आणि टीव्हीके या राजकीय पक्षाचा नेता विजय याच्या झालेल्या सभेवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, यामध्ये अभिनेता विजय आणि त्याच्या पक्षातील इतर तीन नेत्यांना या दुर्घटनेसाठी जबाबदार धरण्यात आले आहे.
पोलिसांनी टीव्हीकेचे जिल्हा सचिव मथियाझगन, राज्य सरचिटणीस बुशी आनंद आणि राज्य संयुक्त सचिव सीटीआर निर्मल कुमार यांच्याविरोधात भादंवि कलम १०५, ११०, १२५ (बी), २२३ आणि तामिळनाडू सार्वजनिक मालमत्ता अधिनियम कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, विजयच्या करुर येथे झालेल्या सभेसाठी त्याला ११ अटी घालण्यात आल्या होत्या. तसेच सुरक्षा आणि वाहतुकीच्या व्यवस्थेसाठी ५०० पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले होते. एफआयआरमधील नोंदीनुसार विजय हा संध्याकाळी ४.४५ रोजी करून जिल्ह्यातील सीमेवर पोहोचला होता. मात्र त्याने सभेच्या स्थळी येण्यासाठी जाणीवपूर्वक उशीर केला. एवढंच नाही तर परवानगी न घेता रोड शो काढला. तसेच सभेसाठी प्रशासनाकडून घालून देण्यात आलेल्या अटींचं पालन करण्यात आले नाही. त्यामुळे उपस्थित लोक आणि पोलिसांना वाहतुकीचं व्यवस्थापन करताना अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान, संध्याकाळी ७ वाजता विजय याची बस वेलुचामीपुरम येथे पोहोचली होती. मात्र पुन्हा सभेला येण्यास उशीर करण्यात आला. त्यामुळे गर्दी वाढली. तसेच चेंगराचेंगरी निर्माण होऊन, अनेकांचा बळी गेला.