गँगस्टरची गर्लफ्रेंड ते देहविक्रयाच्या रॅकेटची सूत्रधार... सोनू पंजाबन कायद्याच्या कचाट्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 16:32 IST2018-03-27T16:32:44+5:302018-03-27T16:32:44+5:30
या चौघांना मारण्यात सोनू पंजाबनचाच हात असल्याची चर्चा आहे.

गँगस्टरची गर्लफ्रेंड ते देहविक्रयाच्या रॅकेटची सूत्रधार... सोनू पंजाबन कायद्याच्या कचाट्यात
नवी दिल्ली: हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवण्याचा आरोप असणाऱ्या सोनू पंजाबन आणि तिचा सहकारी संदीप याच्याविरोधात मंगळवारी दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यांच्यावर गुन्हेगारी षडयंत्र, पॉक्सो या गुन्ह्यांची कलमे लावण्यात आली आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून देहविक्रयाच्या व्यवसायामुळे सोनू पंजाबनचे नाव सातत्याने चर्चेत होते. सोनू पंजाबन ही सुरूवातीला स्वत: शरीरविक्रय करत असे. तिचे मूळ नाव गीता अरोरा असे आहे. एका व्यापाऱ्याचा मृतदेह तिच्या गाडीत मिळाल्यानंतर सोनू पंजाबन सर्वप्रथम चर्चेत आली होती. मात्र, त्यावेळी तिच्याविरोधात कोणतेही पुरावे न सापडल्यामुळे तिची सुटका झाली होती. त्यानंतर तिची मैत्री रोहतकमधील विजय या गुन्हेगाराशी झाली. या दोघांनी लग्नही केले होते. त्यानंतर विजय पोलिसांबरोबरच्या एका चकमकीत मारला गेला होता. त्यानंतर सोनूचे दीपक या गुन्हेगाराशी संबंध होते. तोदेखील आसाममध्ये झालेल्या पोलीस चकमकीत मारला गेला. यानंतर सोनूचे सूत दीपकचा भाऊ हेमंत उर्फ बंटी याच्याशी जुळले. गुन्हेगारी विश्वात हेमंतची प्रचंड दहशत होती. याच काळात सोनूने आपल्या देहविक्रयाच्या व्यवसायाचे जाळे पसरले. दरम्यानच्या काळात हेमंत हादेखील एका पोलीस चकमकीत मारला गेला. त्यानंतर सोनूने अशोक उर्फ बंटी याचा हात धरला. कालांतराने सोनूच्या इतर तीन नवऱ्यांप्रमाणे तोदेखील पोलीस चकमकीत ठार झाला. त्यामुळे या चौघांना मारण्यात सोनू पंजाबनचाच हात असल्याची चर्चा आहे.
मात्र, दरम्यानच्या काळात सोनूने आपल्या देहविक्रयाच्या व्यवसायाचे जाळे मोठ्याप्रमाणावर पसरले होते. तिच्या नावे अनेक मालमत्ता असून ती कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे. तिचा आतापर्यंतचा प्रवास नेहमीच चर्चेचा विषय ठरला. उंची राहणीमान आणि बिनधास्त स्वभावासाठी सोनू पंजाबन ओळखली जाते. सेक्स रॅकेटच्या गुन्ह्यात पकडल्यानंतर आरोपी मुलींना ज्यावेळी न्यायालयात हजर केले जाते तेव्हा या मुली शक्यता प्रसारमाध्यमांसमोर चेहरा लपवताना दिसतात. मात्र, सोनू पंजाबन प्रसारमाध्यमांसमोर आपला चेहरा लपवायची नाही. तिला टीव्ही आणि वर्तमानपत्रांमध्ये स्वत:चे फोटो बघायला आवडायचे. काही वर्षांपूर्वी आलेल्या फुकरे चित्रपटातील भोली पंजाबन हे पात्र सोनूशी मिळतीजुळते असल्याचेही म्हटले जाते.