काँग्रेस मुख्यालयात घुसून पोलिसांनी केली धरपकड; दिल्लीतील घटना; अनेक नेत्यांना मारहाणीचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 05:38 IST2022-06-16T05:37:54+5:302022-06-16T05:38:15+5:30
दिल्लीतील काही पोलीस कर्मचारी बुधवारी जबरदस्तीने काँग्रेस कार्यालयाच्या मुख्यालयात घुसले आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना मारहाण केली,

काँग्रेस मुख्यालयात घुसून पोलिसांनी केली धरपकड; दिल्लीतील घटना; अनेक नेत्यांना मारहाणीचा प्रयत्न
नवी दिल्ली :
दिल्लीतील काही पोलीस कर्मचारी बुधवारी जबरदस्तीने काँग्रेस कार्यालयाच्या मुख्यालयात घुसले आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना मारहाण केली, असा आरोप काँग्रेसने केला आहे. ईडीने राहुल गांधी यांची चौकशी सुरू केली असताना कार्यकर्ते अनेक ठिकाणी निदर्शने करत होते, या दरम्यान ही घटना घडली.
पोलिसांच्या या बेकायदा प्रवेशप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पक्षाने केली आहे. मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, मोदी सरकारच्या सांगण्यावरून गुंडगिरी करत पोलिसांनी काँग्रेसच्या मुख्यालयात प्रवेश केला आणि पक्ष कार्यकर्ते व नेत्यांना मारहाण केली. हा तर सरळसरळ बेकायदेशीर प्रवेश आहे.
सरकारला प्रश्न करत भूपेश बघेल म्हणाले की, त्यांना विचारून मी माझ्या घरी जाणार का? माझ्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी त्यांना विचारू का?. मी नक्षलवादी राज्यातून आलो आहे, मला झेड प्लस सुरक्षा आहे. मला सांगण्यात आले की फक्त एक सुरक्षा रक्षक घेऊन जाता येईल. मला रस्त्याच्या मधोमध तासभर थांबविले आहे. यामागे षड्यंत्र नेमके काय आहे, असा प्रश्न बघेल यांनी उपस्थित केला आहे.
सलग तिसऱ्या दिवशी ८ तास चाैकशी
नॅशनल हेराल्डप्रकरणी बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीली काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीने ८ तास चौकशी केली. आतापर्यंत राहुल गांधी यांची तब्बल ३० तासांहून अधिक चौकशी करण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी गुरुवारचा वेळ मागून घेतल्यामुळे त्यांना ईडीने आता १७ रोजी, शुक्रवारी पुन्हा चौकशीसाठी बोलविले आहे.