पोलिसांनी लाईनमनला केली अटक, संतापलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी असा घेतला बदला, अखेरीस...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 15:46 IST2025-12-10T15:43:45+5:302025-12-10T15:46:46+5:30
Uttar Pradesh News: सरकारच्या दोन खात्यांमध्ये किंवा विभागांमध्ये परस्पर मतभेद होणं ही काही नवी बाब नाही. त्यातून हे सरकारी विभाग एकमेकांवर कुरघोडी करण्याचाही प्रयत्न करतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील हापूड जिल्ह्यात घडली.

पोलिसांनी लाईनमनला केली अटक, संतापलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी असा घेतला बदला, अखेरीस...
सरकारच्या दोन खात्यांमध्ये किंवा विभागांमध्ये परस्पर मतभेद होणं ही काही नवी बाब नाही. त्यातून हे सरकारी विभाग एकमेकांवर कुरघोडी करण्याचाही प्रयत्न करतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील हापूड जिल्ह्यात घडली. येथे वीज विभाग आणि पोलिसांमध्ये जबरदस्त वादावादी झाली. पोलिसांनीवीज विभागाच्या एका लाईनमनला ताब्यात घेतल्याने संतापलेल्या वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी थेट बहादूरगड पोलीस चौकीचा वीजपुरवठाच खंडित केला. तसेच वीज चोरीचा आरोप करत ३.४३ लाख रुपयांच्या थकबाकीची नोटिसही बजावली. वीज पुरवठा खंडित करण्याचा हा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
या वादाची सुरुवात बहादुरगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भदस्याना गावातून झाली. येथील प्रदीप कुमार हे लाईनमन थकित वीजबिलाच्या वसुलीसाठी अमरपाल याच्या घरी गेले होते. तिथे दोघांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दोघांनाही पोलीस ठाण्यात नेले. तिथे त्यांच्यावर बीएनएनएसच्या कलम १७० अन्वये शांतता भंगची कारवाई करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी सदर लाईनमनवर कारवाई केल्याने वीजकर्मचारी नाराज झाले.
त्यानंतर या वीजकर्मचाऱ्यांनी थेट बहादूरगड पोलीस चौकीकडे मोर्चा वळवत चौकीची तपासणी केली. त्यांना पोलीस चौकीमध्ये विजेच्या तारांचं जाळं पसरलेलं आढळलं. त्यानंतर वीज विभागाने पोलीस कर्मचाऱ्यांवर वायर कापून वीज चोरी करत असल्याचा आरोप केला. तसेच पोलीस चौकीचा वीजपुरवठा त्वरित खंडीत केला.
त्यानंतर बेकायदेशीर जोडणी आणि ३.५ लाख रुपयांच्या थकीत विजबिलामुळे पोलीस चौकीचा विजपुरवठा कापण्यात आला आहे, असे अभियंता सूर्य उदय कुमार वर्मा यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणात वाद वाढू लागल्यानंतर उच्चाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला. याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक विनीत भटनागर यांनी सांगितले की, काही गैरसमजांमुळे हे मतभेद झाले होते. ते अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर मिटववण्यात आले आहेत. आता कुठलाही वाद शिल्लक राहिलेली नाही.