मोदींनी पाठीवर कौतुकाची थाप दिलेला 'तो' धर्मांतरण प्रकरणात अटकेत; महाराष्ट्राशी थेट कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 15:53 IST2021-06-30T15:49:52+5:302021-06-30T15:53:01+5:30
पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची चर्चा; उत्तर प्रदेश एटीएसकडून इरफानला बेड्या

मोदींनी पाठीवर कौतुकाची थाप दिलेला 'तो' धर्मांतरण प्रकरणात अटकेत; महाराष्ट्राशी थेट कनेक्शन
नवी दिल्ली/लखनऊ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीआधी धर्मांतरणाचा विषय राज्यात तापला आहे. राज्यातील एटीएसकडून या प्रकरणात अटकसत्र सुरू आहे. मंगळवारी बीडमधून इरफान ख्वाजा खान नावाच्या तरुणाला अटक करण्यात आली. तो बालकल्याण मंत्रालयात दुभाष्या म्हणून कार्यरत आहे. इरफान आतापर्यंत दोनवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत व्यासपीठावर दिसला आहे. २०१७ आणि २०२० मध्ये तो मोदींसोबत दिसला. या दोन्ही कार्यक्रमांत त्यानं मोदींचं भाषण इशाऱ्यांच्या माध्यमातून मूकबधिर मुलांपर्यंत पोहोचवलं होतं. 'दैनिक भास्कर'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
इरफान खानला काल धर्मांतरण प्रकरणी अटक करण्यात आली. तो आतापर्यंत दोनवेळा पंतप्रधान मोदींसोबत व्यासपीठावर दिसला असून मोदींनी त्याच्या पाठीवर कौतुकाची थापदेखील दिली आहे. त्यामुळे धर्मांतरण प्रकरणात गुंतलेला इरफान मोदींच्या व्यासपीठावर कसा पोहोचला, मोदींच्या सुरक्षेत तैनात असलेल्या अधिकाऱ्यांना, एसपीजीला याबद्दल जराही कल्पना नव्हती का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
पंतप्रधान मोदींसोबत इरफान उत्तर प्रदेशातील प्रयागराज आणि गुजरातमधील राजकोटमध्ये एकाच मंचावर दिसला होता. राजकोटमध्ये २९ जून २०१७ मध्ये एक कार्यक्रम संपन्न झाला होता. त्यावेळी मोदींनी भाषण केलं होतं. मोदींनी केलेलं भाषण इरफाननं सांकेतिक भाषेच्या माध्यमातून उपस्थितांपर्यंत पोहोचवलं होतं. मूकबधिर आणि मोदी यांच्यातला दुवा म्हणून त्यावेळी इरफाननं काम केलं होतं.
दुसरा कार्यक्रम २९ फेब्रुवारी २०२० रोजी झाला होता. यावेळीही इरफाननं मोदींसाठी दुभाष्या म्हणून काम केलं. या कार्यक्रमानंतर मोदी इरफानच्या जवळ गेले आणि त्यांनी त्याची पाठ थोपटली. मोदींनी केलेलं कौतुक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मोदींनी स्तुती केलेला क्षण आयुष्यभर माझ्या स्मरणात राहील, असं त्यानंतर इरफाननं माध्यमांना सांगितलं होतं.