फोटोशूट कमी करा, कामाकडे लक्ष द्या; काँग्रेस नेत्याचा मोदींना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 15:46 IST2019-10-15T15:35:40+5:302019-10-15T15:46:48+5:30

नोबेल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जींच्या विधानावरुन टीकास्त्र

PM narendra Modi should attend to work have less photo ops says congress leader Kapil Sibal | फोटोशूट कमी करा, कामाकडे लक्ष द्या; काँग्रेस नेत्याचा मोदींना सल्ला

फोटोशूट कमी करा, कामाकडे लक्ष द्या; काँग्रेस नेत्याचा मोदींना सल्ला

नवी दिल्ली: नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जींनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मोदींनी आता फोटोशूटकडे कमी आणि कामाकडे जास्त लक्ष द्यावं, असा सल्ला सिब्बल यांनी पंतप्रधानांना दिला आहे. 

मूळचे भारतीय असलेल्या अभिजीत बॅनर्जींना काल अर्थशास्त्रातलं नोबेल जाहीर झालं. यानंतर एका अमेरिकन वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना बॅनर्जींनी अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. 'भारतीय अर्थव्यवस्था दोलायमान अवस्थेत आहे. विकासदराची ताजी आकडेवारी पाहता, नजीकच्या भविष्यात अर्थव्यवस्था सावरेल, याची खात्री देता येत नाही. गेली पाच-सहा वर्षे निदान काही विकास होताना तरी दिसत होता, पण ती आशाही आता मावळली आहे,' असं बॅनर्जींनी म्हटलं होतं. 



बॅनर्जींनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुन सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. 'मोदीजी खोटं बोलताहेत का? अभिजीत बॅनर्जी: 1) भारतीय अर्थव्यवस्था दोलायमान स्थितीत आहे. 2) आकडेवारीत राजकीय हस्तक्षेप आहे. 3) शहरी आणि ग्रामीण भागातील मागणी घटली आहे. 4) आपण (भारत) संकटात आहे. त्यामुळे फोटोशूटऐवजी कामाकडे लक्ष द्या,' असा खोचक सल्ला सिब्बल यांनी ट्विटमधून पंतप्रधानांना दिला आहे. 

जागतिक बँकेनंदेखील भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला सध्या मरगळ आली असून येत्या काही दिवसांत अर्थक्षेत्राची स्थिती आणखी खालावेल, असं भाकीत जागतिक बँकेनं वर्तवलं आहे. काही आर्थिक तिमाहींपूर्वी भारताच्या जीडीपी वाढीचा दर चीनपेक्षाही जास्त होता. तो आता बांगलादेश आणि नेपाळपेक्षा कमी असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताच्या जीडीपी वाढीचा दर ७.५ टक्के असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र त्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था केवळ ५ टक्क्यांनी वाढली. गेल्या ६ वर्षांमधील हा निच्चांक आहे. 

Web Title: PM narendra Modi should attend to work have less photo ops says congress leader Kapil Sibal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.