pm narendra modi rally in puducherry modi Slams congress and rahul gandhi | "काँग्रेस खोट्याच्या आधारावर चालते, लोकांची स्वप्न भंग केली अन् त्यांना धोका दिला", पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

"काँग्रेस खोट्याच्या आधारावर चालते, लोकांची स्वप्न भंग केली अन् त्यांना धोका दिला", पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुरुवारी पुद्दुचेरीमध्ये जनतेला संबोधित केलं आहे. या सभेदरम्यान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्लाबोल केला आहे. विविध मुद्द्यांवरून निशाणा साधला आहे. काँग्रेस खोट्याच्या आधारावर चालते असा घणाघात मोदींनी केला आहे. "पुद्दुचेरीमधील हवा आता बदलत आहे. हे या सभेतून दिसून आलं आहे. गेल्या निवडणुकीत येथील लोकांनी काँग्रेसला मत दिलं. मात्र काँग्रेसने लोकांना धोका दिला आहे" असं मोदींनी म्हटलं आहे. तसेच राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) मच्छीमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय करू या केलेल्या विधानावरही पलटवार केला आहे. 

नरेंद्र मोदी यांनी "काँग्रेसने लोकांची स्वप्न भंग केली आहेत. येथे जे सरकार होतं ते लोकांचं नाही तर काँग्रेसच्या हायकमांडची सेवा करत होतं. येथील माजी मुख्यमंत्री काँग्रेस हायकमांडची चप्पल घेऊन जात असत, मात्र येथील लोकांना गरिबीतून वर काढू शकत नव्हते. काँग्रेसच्या सरकारने लोकांसाठी काम केलं नाही तसेच काँग्रेसने इतरांनाही लोकांसाठी काम करण्याची परवानगी दिली नाही. राज्य सरकारने आपल्या कार्यकाळात येथे केंद्र योजना राबवण्यास परवानगी दिली नाही" असं म्हटलं आहे. 

पुद्दुचेरीतील दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी मच्छीमारांशी संवाद साधताना मच्छिमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करतील असं म्हटलं आहे. यावरून पंतप्रधानांनी राहुल गांधींना सणसणीत टोला लगावला आहे. "काँग्रेस खोट्याच्या आधारावर चालते. काँग्रेसचे नेते येथे आले आणि म्हणाले की ते मत्स्यव्यवसाय मंत्रालय तयार करतील, परंतु आमच्या सरकारने आधीच हे मंत्रालय बनविले आहे जे लोकांसाठी काम करत आहे. देशभरातील लोक आता काँग्रेसला नाकारत आहेत" असं म्हणत मोदींनी जोरदार निशाणा साधला आहे. तसेच काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"राहुल गांधी पुद्दुचेरीला गेले आणि त्यांच्या मिडास टचमुळे काँग्रेसचं सरकार पडलं" 

भाजपाने काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर (Rahul Gandhi) जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते आणि आयटी सेलचे राष्ट्रीय प्रमुख असणाऱ्या अमित मालवीय (Amit Malviya) यांनी काँग्रेसला बहुमत सिद्ध न करता आल्यानंतर सणसणीत टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. सध्या राहुल गांधी हे पुडुचेरीच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे राहुल यांच्या पायगुणामुळेच काँग्रेसचं सरकार पडल्याचं म्हणत मालवीय यांनी निशाणा साधला आहे. "राहुल गांधी पुद्दुचेरीला गेले आणि त्यांनी त्यांच्या मिडास टचमुळे या केंद्रशासित प्रदेशामधील काँग्रेसचं सरकार पाडलं" असं मालवीय यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: pm narendra modi rally in puducherry modi Slams congress and rahul gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.