"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 12:53 IST2025-06-13T12:45:31+5:302025-06-13T12:53:47+5:30
अहमदाबाद विमान अपघातातून बचावलेल्या रमेश विश्वासकुमारची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली.

"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
Ahmedabad Air India Plane Crash: गुजरातच्याअहमदाबादमध्ये लंडनला जाणाऱ्या विमानाच अपघात होऊन २६५ जणांचा मृत्यू झाला. उड्डाणानंतर काही सेकंदामध्येच हे विमान एका निवासी डॉक्टरांच्या इमारतीवर कोसळले. त्यामुळे २५ डॉक्टरांसह २४१ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. विमानामध्ये २४२ प्रवासी होते, त्यापैकी १६९ भारतीय, ७३ ब्रिटिश, सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होता. आश्चर्याची बाब म्हणजे या विमान दुर्घटनेत केवळ एकाच प्रवाशाचा जीव वाचला. लंडनमधील रहिवासी असलेले रमेश विश्वासकुमार या अपघातात जखमी झाले तर त्यांच्या भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानात २४२ जण होते, त्यापैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. एअर इंडियाचे विमान दुपारी १.३८ वाजता लंडनला निघाले. उड्डाणानंतर काही सेकंदातच विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला धडकले. शुक्रवारी नरेंद्र मोदी यांनी विमान अपघातातील जखमींची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी अपघाताच बचाववेल्या रमेश विश्वासकुमार याचीही भेट घेतली. यावेळी रमेशने पंतप्रधान नरेंद्र मोदींना घडलेल्या घटनेची माहिती दिली.
"पंतप्रधान मोदींनी मला अपघात कसा झाला ते विचारलं. त्यावर मी त्यांना घटनाक्रम सांगितला. ते सगळं माझ्या डोळ्यांसमोर झालं. मला स्वतःला विश्वास बसत नाहीये की मी त्यातून जिवंत कसा बाहेर आलो. कारण थोड्यावेळासाठी माझाही मृत्यू होणार आहे असं वाटतं होतं. पण मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा मला कळलं की मी जिवंत आहे. मी सेटबेल्ट काढला आणि तिथून बाहेर पडलो. माझ्यासमोरच एअरहोस्टेसचा आणि बाकीच्या लोकांचे मृतदेह पडले होते", असं रमेश विश्वासकुमारने दूरदर्शनसोबत बोलताना सांगितले.
"टेकऑफ नंतर विमानाचा वेग वाढवताच, काहीतरी विचित्र वाटले. अचानक ५-१० सेकंदांसाठी सर्व काही थांबल्यासारखे वाटले. नंतर अचानक विमानात हिरवी आणि सफेद लाईट सुरु झाली. असं वाटत होतं की जणू काही पायलटने उड्डाणासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती आणि मग ते थेट होस्टलच्या इमारतीत घुसले. विमानाचा ज्या भागात माझी सीट होती तो भाग इमारतीच्या खालच्या भागाला धडकला असावा. वरच्या भागात आग लागली होती, तिथे बरेच लोक अडकले होते. कदाचित मी सीटसह खाली पडलो. मी कसा तरी बाहेर पडण्यात यशस्वी झालो. दरवाजा तुटलेला होता आणि मला समोर काही रिकामी जागा दिसली, म्हणून मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला," असे विश्वासकुमारने सांगितले.
VIDEO | Ahmedabad Plane Crash: PM Modi meets Vishwaskumar Ramesh, the lone survivor who was onboard the ill-fated Air India flight AI-171, at the Civil Hospital.
— Press Trust of India (@PTI_News) June 13, 2025
Vishwaskumar Ramesh was in '11A' seat of the Boeing 787 Dreamliner which was carrying 242 passengers and crew. He was… pic.twitter.com/qEuf9mhGFb
"दुसऱ्या बाजूला एक भिंत होती, कदाचित तिथून कोणीही बाहेर पडू शकले नाही. माझ्या डोळ्यासमोर दोन एअर होस्टेस, एक काका-काकी आणि सर्व काही जळत होते. या अपघातात माझा डावा हात गंभीरपणे भाजला. बाहेर येताच आग पसरत होती. जर काही सेकंद जास्त उशीर झाला असता तर कदाचित माझ्यासोबतही काही वाईट घडले असते," असं विश्वासकुमारने म्हटलं.