दिल्लीत २७ वर्षांनी भाजपला स्पष्ट बहुमत; पंतप्रधान मोदींनी दिल्लीकरांना दिली मोठी गॅरंटी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 17:33 IST2025-02-08T17:26:51+5:302025-02-08T17:33:24+5:30
दिल्लीतल्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांचे आणि दिल्लीकरांचे आभार मानले आहेत.

दिल्लीत २७ वर्षांनी भाजपला स्पष्ट बहुमत; पंतप्रधान मोदींनी दिल्लीकरांना दिली मोठी गॅरंटी!
Delhi Assembly Elections: दिल्लीत २७ वर्षांनंतर भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, भाजपने ४१ जागा जिंकल्या एकूण ४८ जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी आम आदमी पार्टीने देखील २० जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. २०१५ पासून दिल्लीत सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाचा पराभव केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आनंदित झाले आहेत. या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विकास आणि सुशासनाचा विजय असल्याचे म्हटले. यासोबत भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी दिल्लीकरांना गॅरंटी देखील दिली आहे.
भाजपने २७ वर्षांनंतर दिल्लीत पुनरागमन केलं आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागले आहे. दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला असून पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज आणि इतर अनेक बडे नेतेही पराभूत झाले आहेत. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी पराभव स्वीकारला असून आपण लोकांसाठी काम करत राहू असे म्हटले आहे. दुसकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत दिल्लीकरांना महत्त्वाची गॅरंटी दिली आहे
"आम्ही दिल्लीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि इथल्या लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही ही आमची गॅरंटी आहे. यासोबतच विकसित भारताच्या उभारणीत दिल्लीची महत्त्वाची भूमिका आहे, हे आम्ही सुनिश्चित करू. मला आमच्या सर्व भाजप कार्यकर्त्यांचा अभिमान आहे, ज्यांनी या जनादेशासाठी रात्रंदिवस काम केले. आता आम्ही आमच्या दिल्लीकरांच्या सेवेसाठी आणखी मजबुतीने काम करत राहू," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
जनशक्ति सर्वोपरि!
— Narendra Modi (@narendramodi) February 8, 2025
विकास जीता, सुशासन जीता।
दिल्ली के अपने सभी भाई-बहनों को @BJP4India को ऐतिहासिक जीत दिलाने के लिए मेरा वंदन और अभिनंदन! आपने जो भरपूर आशीर्वाद और स्नेह दिया है, उसके लिए आप सभी का हृदय से बहुत-बहुत आभार।
दिल्ली के चौतरफा विकास और यहां के लोगों का जीवन उत्तम…
आम्ही राजकारणात सेवा करण्यासाठीच आलो आहोत - अरविंद केजरीवाल
"दिल्लीच्या जनतेने भाजपाला ज्या गोष्टींसाठी मतं दिली आहेत ती भविष्यात नीट पार पाडली जातील. गेल्या १० वर्षात आमच्या पक्षाने प्रत्येक क्षेत्रात कार्यरत राहून दिल्लीचा विकास केला. दिल्लीकरांना सर्व सोयीसुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहिला. दिल्लीतील पायाभूत सुविधा सुधारण्यावरही आम्ही काम केले. आता आम्ही विरोधी पक्षाची भूमिकाही चोखपणे पार पाडू. दिल्लीकरांच्या सुख-दु:खात आम्ही त्यांच्या सोबत असू. आम्ही राजकारणात सेवा करण्यासाठीच आलो आहोत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी घेतलेल्या कष्टासाठी त्यांचे आभार," अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी दिली.