"इतर भारतीयांवर हिंदू परंपरा थोपवल्या जात आहेत..."; PM मोदींच्या वक्तव्यावरून ओवेसी भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 10:00 IST2024-08-16T09:59:36+5:302024-08-16T10:00:25+5:30
PM मोदी यांनी समान नागरी संहितेसंदर्भात (UCC) आपल्या सरकारची भूमिकाही स्पष्ट केली. आपल्या भाषणात, देशाला धर्मनिरपेक्ष नागरी संहितेची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. यानंतर, आता विरोधकांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत.

"इतर भारतीयांवर हिंदू परंपरा थोपवल्या जात आहेत..."; PM मोदींच्या वक्तव्यावरून ओवेसी भडकले
Uniform Civil Code: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधीत केले. यावेळी त्यांनी समान नागरी संहितेसंदर्भात (UCC) आपल्या सरकारची भूमिकाही स्पष्ट केली. आपल्या भाषणात, देशाला धर्मनिरपेक्ष नागरी संहितेची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. यानंतर, आता विरोधकांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीही यासंदर्भात भाजपवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले ओवेसी? -
UCC मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधताना ओवेसी म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा समान नागरी संहितेचा मुद्दा उपस्थित केला आहे. भाजपची UCC आवृत्ती ही हिंदू अविभक्त कुटुंब, अनुसूचित जाती आणि हिंदू चालीरीतींना अपवाद आहे. दयाभागा आणि मिताक्षरा यांसारख्या हिंदूंमधील विविध परंपरा आणि संस्कृतींचे काय होणार? उत्तराखंड यूसीसी भाजपच्या ढोंगीपणाचे एक आदर्श प्रकरण आहे. अशा पद्धतीने उर्वरित भारतीयांवर हिंदू मूल्ये आणि परंपरा थोपवल्या जात आहेत."
महिला सुरक्षेवरूनही भाजपवर हल्लाबोल -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासंदर्भात असदुद्दीन ओवेसी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे, यात त्यांनी म्हटले आहे, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या भाषणात महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या (पक्षाच्या) सरकारने बिल्किस बानोचे बलात्कारी आणि तिच्या कुटुंबीयांच्या मारेकऱ्यांची सुटका करण्यास मंजुरी दिली आहे. त्यांनी (बिल्कीस बानो) न्यायासाठी 15 वर्षं लढा दिला आणि नरेंद्र मोदी हे तेव्हा अधिक काळ गुजरातचे मुख्यमंत्री होते."
याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकात एका अशा उमेदवारासाठी प्रचार केला, ज्याच्यावर हजारो महिलांविरोधात घृणास्पद गुन्ह्यांचा आरोप आहे. एवढेच नाही, तर हा गुन्हा सार्वजनिक होण्यापूर्वीच भाजपच्या वरिष्ठांना यासंदर्भात माहिती होती, असा दावाही त्यांनी केला आहे.