CAA: मोदींना मठात येण्याची परवानगी का दिली?; पंतप्रधानांच्या 'त्या' विधानांमुळे रामकृष्ण मिशन नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 11:38 AM2020-01-14T11:38:29+5:302020-01-14T11:46:26+5:30

मोदींच्या विधानांनंतर अनेक सदस्यांची रामकृष्ण मिशनला पत्रं

pm Modis remarks on Citizenship Amendment Act upsets Ramakrishna Mission members | CAA: मोदींना मठात येण्याची परवानगी का दिली?; पंतप्रधानांच्या 'त्या' विधानांमुळे रामकृष्ण मिशन नाराज

CAA: मोदींना मठात येण्याची परवानगी का दिली?; पंतप्रधानांच्या 'त्या' विधानांमुळे रामकृष्ण मिशन नाराज

Next

बेलूर: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामकृष्ण मिशनच्या बेलूर मठात केलेल्या राजकीय विधानांमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मोदींनी सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल (सीएए) केलेल्या विधानांचा मिशनशी संबंधित अनेकांनी निषेध केला असून काहींनी थेट मिशनच्या पदाधिकाऱ्यांना पत्रं लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मोदींना मठात येण्याची परवानगी का दिली, अशी विचारणा या पत्रांमधून करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी शनिवारी बेलूर मठाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी सीएएवर भाष्य केलं. मोदींच्या या विधानांशी आमचा काहीही संबंध नसल्याचं मिशननं जाहीर केलं आहे. 

मोदींनी शनिवारी बेलूर मठाला भेट दिली. श्री रामकृष्ण ज्या खोलीत चिंतन करायचे, त्या खोलीचंदेखील मोदींनी दर्शन घेतलं. यानंतर मोदींनी मठात भाषण केलं. त्यात त्यांनी सीएएवर भाष्य केलं. सीएएमुळे कोणाचंही नागरिकत्व काढून घेतलं जाणार नाही, याची ग्वाही मोदींनी दिली. मोदींची ही विधानं राजकीय स्वरुपाची असल्याचा दावा मठात येणाऱ्या भक्तांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केला आहे. 'द हिंदू'नं याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

पंतप्रधान मोदींनी केलेली वादग्रस्त राजकीय विधानं अतिशय दु:खद असल्याचं रामकृष्ण मिशनच्या एका सदस्यानं म्हटलं. रामकृष्ण मिशन अराजकीय संस्था आहे. त्यामुळे मोदींनी मिशनच्या व्यासपीठाचा राजकीय वापर करायला नको होता, असं मत या सदस्यानं व्यक्त केलं. या सदस्यानं दिवंगत स्वामी आत्मस्थानानंद यांच्याकडून दीक्षा घेतली आहे. स्वामी आत्मस्थानानंद आपले गुरू असल्याचा दावा मोदींनी केला होता.
 
रामकृष्ण मिशनची दीक्षा देण्याची एक अधिकृत पद्धत आहे. मोदींना कोणीही अधिकृतपणे दीक्षा दिलेली नाही, असं मिशनचे सदस्य गौतम रॉय यांनी सांगितलं. मठात येऊन राजकीय विधानं करण्याची परवानगी मोदींना देण्यात आली नव्हती, असंदेखील गौतम म्हणाले. गेल्या काही वर्षांत मिशनचा राजकीय वापर केला जात आहे. मोदींनी मठाला दिलेल्या भेटीतूनही तेच दिसतं, असं गौतम यांनी म्हटलं. 
 

Web Title: pm Modis remarks on Citizenship Amendment Act upsets Ramakrishna Mission members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.