पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पाटण्यात तुफान राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 13:48 IST2025-08-29T12:37:04+5:302025-08-29T13:48:31+5:30
Bihar News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरजेडी आणि काँग्रेसच्या संयुक्त सभेमध्ये शिविगाळ आणि अपशब्द उच्चारल्याच्या मुद्द्यावरून बिहारमध्ये वातावरण चांगलंच तापलं आहे. शुक्रवारी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पाटणा येथे काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं.

पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पाटण्यात तुफान राडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरजेडी आणि काँग्रेसच्या संयुक्त सभेमध्ये शिविगाळ आणि अपशब्द उच्चारल्याच्या मुद्द्यावरून बिहारमध्ये वातावरण चांगलंच तापलं आहे. शुक्रवारी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पाटणा येथे काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं. यावेळी भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले. तसेच दोघांमध्ये तुफान राडा झाला. भाजपाचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोदींबाबत वापरण्यात आलेल्या अपशब्दांच्याविरोधात काँग्रेसच्या कार्यालयावर हल्लाबोल केला.
याबाबत माहिती देताना काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयाचं गेट तोडून आत घुसले. तसेच त्यांनी लाठीमार केला. कार्यालयात उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. तसेच दगडविटांचा मारा केला. यामध्ये काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना दुखापत झाली आहे. तसेच एका कार्यकर्त्याचं डोकं फुटलं असा आरोपही या नेत्याने केला.
दरम्यान, बिहारमधील दरभंगा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या युवकाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहार पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याचे नाव रिजवी असल्याचे समजते. तो दरभंगामध्येच राहतो. त्याने काँग्रेस रॅली दरम्यान पंतप्रधान मोदींसंदर्भात अपशब्द वापरले होते. यावरून राजकीय वातावरणही तापले होते. यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.