पंतप्रधान आसियान परिषदेस व्हर्च्युअली उपस्थित राहणार; एस. जयशंकर ‘ईस्ट एशिया समिट’ला जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 07:17 IST2025-10-24T07:17:17+5:302025-10-24T07:17:17+5:30
आसियानशी संबंध मजबूत करणे हे भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट पॉलिसी’ आणि ‘इंडो-पॅसिफिक व्हिजन’चे महत्त्वपूर्ण घटक आहे.

पंतप्रधान आसियान परिषदेस व्हर्च्युअली उपस्थित राहणार; एस. जयशंकर ‘ईस्ट एशिया समिट’ला जाणार
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मलेशियातील क्वालालंपूर येथे वार्षिक आसियान परिषदेला प्रत्यक्ष उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्या पूर्वनियोजित गोष्टींच्या वेळापत्रकातील अडचणींमुळे ते या परिषदेत २६ ऑक्टोबर रोजी व्हर्च्युअली सहभागी होतील.
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर हे मोदी यांचे प्रतिनिधी म्हणून २७ ऑक्टोबरला क्वालालंपूर येथे होणाऱ्या २०व्या ‘ईस्ट एशिया समिट’ला उपस्थित राहणार आहेत. ही परिषद २६ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणार आहे. या परिषदेत पंतप्रधान आणि आसियान देशांचे नेते मिळून आसियान-भारत संबंधांचा आढावा घेतील. तसेच परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करतील. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, आसियानशी संबंध मजबूत करणे हे भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट पॉलिसी’ आणि ‘इंडो-पॅसिफिक व्हिजन’चे महत्त्वपूर्ण घटक आहे.
‘बचके रहना रे बाबा’, काँग्रेसचा आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी आसियान शिखर परिषदेसाठी मलेशियाला न जाता आणि व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी होणार असल्याने, काँग्रेसने गुरुवारी असा दावा केला की पंतप्रधान तिथे न जाण्याचे कारण म्हणजे त्यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कोंडीत सापडायचे नाही. काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनीपुढे म्हटले की, “मोदी या शिखर परिषदेपासून दूर राहत आहेत कारण ट्रम्पही तिथे असणार आहेत. पंतप्रधानांना बहुधा ते जुने बॉलिवूडच्या चित्रपटातील गाणे आठवत असेल – ‘बचके रहना रे बाबा, बचके रहना रे...’