'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 13:07 IST2025-10-01T13:06:07+5:302025-10-01T13:07:41+5:30
PM Modi RSS: 'प्रत्येक स्वयंसेवकाने अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला. संघाच्या विचारधारेनुसार कोणताही हिंदू लहान किंवा मोठा नाही.'

'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
PM Modi RSS: 'स्वतंत्र्यानंतर अनेक वेळा संघाला संपवण्याचे, चिरडण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा राहिला. प्रत्येक स्वयंसेवकाने नेहमी समाजासाठी काम केले,' अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
पीएम मोदी पुढे म्हणतात, 'संघाच्या या प्रवासात अनेकदा हल्ले झाले, संघाला मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखण्यासाठी षड्यंत्रे झाली. स्वतंत्रतेनंतर संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले. परमपूज्य गुरुजींना (गोलवलकर गुरुजी) खोट्या खटल्यात अडकवून जेलमध्ये टाकण्यात आले. पण जेव्हा ते जेलमधून बाहेर आले, तेव्हा त्यांनी एक प्रेरणादायी उदाहरण दिले. 'कधी कधी जीभ दातांखाली येते, दाबली जाते, चिरडली जाते. पण आपण दात मोडत नाही, कारण दातही आपलेच आहेत आणि जीभही आपलीच आहे.''
राष्ट्रनिर्माणाचा महान उद्देश, व्यक्तिनिर्माणाचा स्पष्ट मार्ग
मोदी पुढे म्हणतात, 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या औचित्याने संघाच्या प्रवासाचा आढावा घेताना ‘राष्ट्रनिर्माणाचा महान उद्देश आणि व्यक्तिनिर्माणाचा स्पष्ट मार्ग’ हा संघाच्या कार्याचा केंद्रबिंदू ठरल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. शाखा ही साधी, सोपी आणि जीवन्त कार्यपद्धती संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासाचा पाया मानला गेला आहे. संघाच्या स्थापनेपासूनच एकच भाव ठाम राहिला आणि तो म्हणजे “राष्ट्र प्रथम” आणि एकच ध्येय नजरेसमोर ठेवले आहे, ते म्हणजे “एक भारत, श्रेष्ठ भारत”.
भेदभावाविरुद्ध लढणारी संघाची विचारधारा
पंतप्रधान मोदी यांनी पुढे सांगितले, 'प्रत्येक स्वयंसेवकाने अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला. संघाच्या विचारधारेनुसार कोणताही हिंदू लहान किंवा मोठा नाही. प्रत्येक आपत्तीत स्वयंसेवक मदतीसाठी धावून गेले. कोरोना काळातही स्वयंसेवक देशवासीयांच्या मदतीसाठी पुढे सरसावले. संघाने ‘एक विहीर, एक मंदिर आणि एक स्मशान’ ही संकल्पना मांडली. आजही प्रत्येक स्वयंसेवक भेदभावाविरुद्ध लढत आहे.'
LIVE: PM Shri @narendramodi participates in RSS Centenary Celebrations in New Delhi. #RSS100Yearshttps://t.co/wu7axIo3xY
— BJP (@BJP4India) October 1, 2025
संघाचे शताब्दी वर्ष पाहणे ही पिढीचे सौभाग्य
'आज महानवमी आहे. उद्या विजयादशमी महापर्व आहे. हा दिवस अन्यायावर न्यायाचा, असत्यावर सत्याचा आणि अंधःकारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो. हाच भारतीय संस्कृतीचा संदेश आहे. अशा पवित्र विजयादशमीच्या काळात 100 वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली, हा योगायोग नव्हता. ही आपल्या राष्ट्रचेतनेची पुनःप्रकट झालेली परंपरा होती. आज आपल्या पिढीला संघाचे शताब्दी वर्ष पाहण्याचे भाग्य लाभले आहे. मी या प्रसंगी देशसेवेसाठी समर्पित लाखो स्वयंसेवकांना शुभेच्छा देतो आणि संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो,' असेही पीएम मोदी म्हणाले.
सामान्य व्यक्तींचे असामान्य कार्य
'भारताच्या विभाजनाच्या वेदनेत लाखो कुटुंबे बेघर झाली होती. त्या वेळी स्वयंसेवकांनी शरणार्थ्यांची निःस्वार्थ सेवा केली. संविधानिक संस्थांबद्दलची आस्था आणि समाजाशी असलेली आत्मीयता यांनी प्रत्येक स्वयंसेवकाला स्थितप्रज्ञ आणि संवेदनशील ठेवले. संघाबद्दल म्हटले जाते की, येथे सामान्य माणसे एकत्र येऊन असामान्य आणि अभूतपूर्व कार्य करतात. ही व्यक्तिनिर्मितीची सुंदर प्रक्रिया आजही संघाच्या शाखांमध्ये पाहायला मिळते. संघ शाखेचे मैदान ही अशी प्रेरणाभूमी आहे, जिथे स्वयंसेवकाचा प्रवास ‘अहं’ पासून ‘वयं’ पर्यंत होतो. शाखा म्हणजे व्यक्तिनिर्माणाची यज्ञवेदी असून, तीच संघाच्या शतकभराच्या कार्याची खरी ओळख आहे.'
विशेष टपाल तिकिट आणि नाणे जारी
संघाच्या 100 वर्षांच्या गौरवमयी प्रवासाच्या स्मृतिप्रीत्यर्थ भारत सरकारने विशेष टपाल तिकिट आणि 100 रुपयांचे स्मृती नाणे जारी केले. या नाण्यावर एका बाजूला भारताचे राष्ट्रीय चिन्ह असून दुसऱ्या बाजूला सिंहासह वरदमुद्रेतील भारतमातेची प्रतिमा आहे.