PM मोदींचा २७ देशांकडून सन्मान, ८ मुस्लिम देशांचाही समावेश; २०२५ मध्ये विक्रमी कामगिरी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 12:25 IST2025-07-10T12:24:45+5:302025-07-10T12:25:36+5:30
PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत २७ देशांकडून आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

PM मोदींचा २७ देशांकडून सन्मान, ८ मुस्लिम देशांचाही समावेश; २०२५ मध्ये विक्रमी कामगिरी...
PM Narendra Modi:पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना आतापर्यंत २७ देशांकडून आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. या यादीतील नवीन नाव आफ्रिकन देश नामिबियाचे आहे. पंतप्रधान मोदींना बुधवारी नामिबियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्विट्सचिया मिराबिलिस' प्रदान करण्यात आला. नामिबियाचे अध्यक्ष नेतुम्बो नंदी-नदैतवाह यांनी विंडहोक येथे झालेल्या समारंभात पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान केला.
विशेष म्हणजे, मे २०१४ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी पदभार स्वीकारल्यापासून हा त्यांचा २७ वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. तसेच, त्यांच्या सध्याच्या परदेश दौऱ्यात त्यांना देण्यात आलेला हा चौथा पुरस्कार आहे.
२०१६ मध्ये ही मालिका सुरू झाली
पंतप्रधान मोदींना ११ वर्षांच्या कार्यकाळात आतापर्यंत २७ देशांनी सन्मानित केले आहे. हा सन्मान मिळण्याची प्रक्रिया २०१६ मध्ये सुरू झाली. म्हणजेच, ९ वर्षांच्या आत पंतप्रधान मोदींना हे २७ पुरस्कार मिळाले आहेत. तर, २०२५ सुरू झाल्यापासून गेल्या ७ महिन्यात ७ पुरस्कार मिळाले आहेत. यापूर्वी २०२३ आणि २०२४ मध्ये त्यांना ६ देशांकडून सन्मान मिळाले होते.
गेल्या काही वर्षांत पंतप्रधान मोदींना मध्य पूर्वेपासून युरोप आणि आफ्रिकेपर्यंतच्या देशांनी सन्मानित केले आहे. या सन्मानांमध्ये सौदी अरेबियाने दिलेला ऑर्डर ऑफ किंग अब्दुल अजीज आणि अफगाणिस्तानने दिलेला ऑर्डर ऑफ अमानुल्ला खान यांचा समावेश आहे. हे दोन्ही पुरस्कार २०१६ मध्ये देण्यात आले. तर, २०१८ मध्ये त्यांना ऑर्डर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन, त्यानंतर २०१९ मध्ये मालदीवने दिलेला ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश्ड रूल ऑफ इज्जुद्दीन आणि त्याच वर्षी नंतर बहरीनने दिलेला किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसान्सचा समावेश आहे.
तसेच, २०२३ मध्ये त्यांना इजिप्तच्या ऑर्डर ऑफ द नाईल आणि फ्रान्सच्या लीजन डी'ऑनरने सन्मानित करण्यात आले. २०२४ मध्येही हाच ट्रेंड कायम राहिला जेव्हा त्यांना सहा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
८ मुस्लिम देशांकडूनही सन्मान मिळाले
पंतप्रधान मोदींना ज्या २७ देशांकडून पुरस्कार मिळाले आहेत, त्यात ८ मुस्लिम देश आहेत. यात कुवेत, इजिप्त, बहरीन, मालदीव, युएई, पॅलेस्टाईन, अफगाणिस्तान आणि सौदी अरेबिया हे देश आहेत.
पंतप्रधान मोदींना कोणत्या देशांनी कधी सन्मानित केले?
२०१६- सौदी अरेबिया, अफगाणिस्तान
२०१९- बहरीन, मालदीव, युएई
२०२०- अमेरिका
२०२१- भूतान
२०२३- ग्रीस, फ्रान्स, इजिप्त, पलाऊ, पापुआ न्यू गिनी, फिजी
२०२४- कुवेत, गयाना, बार्बाडोस, नायजेरिया, डोमिनिका, रशिया
२०२५- नामिबिया, ब्राझील, त्रिनिदाद आणि टोबॅगो, घाना, सायप्रस, श्रीलंका, मॉरिशस