'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 13:46 IST2025-10-22T13:45:58+5:302025-10-22T13:46:25+5:30
पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या फोन संभाषणावर काँग्रेसने टीका केली आहे.

'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
नवी दिल्ली: दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवर झालेले संभाषण राजकीय वादाचा विषय बनले आहे. दोन्ही नेत्यांनी या संवादाची पुष्टी केली असली, तरी काँग्रेसचे नेते आणि पक्षाचे महासचिव जयराम रमेश यांनी या संभाषणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’ (पूर्वी ट्विटर) वर लिहिले की, ट्रम्प यांनी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला आणि दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. मात्र, जयराम रमेश यांनी आरोप केला की, या संवादात केवळ शुभेच्छांचा विषय नव्हता, तर रशियाकडून भारत आयात करत असलेल्या कच्च्या तेलासारख्या संवेदनशील विषयांवरही चर्चा झाली, ज्याचा उल्लेख पंतप्रधानांनी जाणीवपूर्वक टाळला आहे.
जयराम रमेश आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “पंतप्रधानांनी अखेर सार्वजनिकरित्या हे मान्य केले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांना फोन केला. पण मोदींनी फक्त एवढेच सांगितले की, ट्रम्प यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पण, मोदी काही गोष्टी लपवतात, तर ट्रम्प त्या उघड करतात.”
The PM has finally acknowledged publicly that President Trump called him up and that the two spoke to each other. But all that the PM has said is that the US President extended Diwali greetings.
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) October 22, 2025
But while Mr. Modi conceals, Mr. Trump reveals.
On his part, the US President has… pic.twitter.com/b2ceH2V7VH
त्यांनी पुढे आरोप केला की, "ट्रम्प यांनी स्वतः म्हटले होते की, भारताने रशियाकडून तेल आयात थांबवण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या सहा दिवसांत ही चौथी वेळ आहे, जेव्हा ट्रम्प यांनी भारताच्या धोरणांबाबत स्वतः घोषणा केली आहे. यापूर्वी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मोदींपूर्वीच ऑपरेशन सिंदूर बंद करण्याची घोषणा केली होती," अशी बोचरी टीका जयराम रमेश यांनी केली.
रशियन तेल आयातीवर ट्रम्प काय म्हणाले ?
वॉशिंग्टनमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, "त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत व्यापार आणि रशियाकडून तेल खरेदी या मुद्द्यांवर चर्चा केली. ट्रम्प यांनी असेही म्हटले की, त्यांना विश्वास आहे की, भारत आता रशियाकडून तेल आयात कमी करेल किंवा थांबवेल, ज्यामुळे अमेरिकेच्या निर्बंध धोरणाचा आदर राखला जाईल."