"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 16:34 IST2025-06-22T15:43:11+5:302025-06-22T16:34:34+5:30

अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी इराणी राष्ट्राध्यक्षांशी चर्चा केली आहे.

PM Modi has spoken to Iranian President regarding Iran attack | "लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

PM Modi on Iran Attack: अमेरिकेने इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर केलेल्या हल्ल्यामुळे जगात घबराट पसरली आहे. हा हल्ला करुन अमेरिकेने इराण आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या या युद्धात उडी घेतली. अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुख अणुऊर्जा प्रकल्पांवर मोठे हल्ले केले. अनेक मुस्लीम देशांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. यामध्ये ओमान, पाकिस्तान आणि सौदी अरेबियाचा समावेश आहे. इराणवरील हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष मसूद पाझ्श्कियान यांच्याशी चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी हा तणाव कमी करण्याचे आवाहन केलं.

अमेरिकेने इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केला. भारतीय वेळेनुसार रविवारी पहाटे ४:३० वाजता हा हल्ला करण्यात झाला. इराणवरील हल्ल्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राला संबोधित केले. इराणचे महत्त्वाचे अणुऊर्जा प्रकल्प पूर्णपणे नष्ट झाले आहेत. फोर्डोवर बॉम्बचा एक संपूर्ण साठा टाकण्यात आल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी इराणी राष्ट्राध्यक्षांशी चर्चा केली आहे.   

"मी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी बोललो. आम्ही सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. अलिकडच्या काळात वाढलेल्या तणावाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. मी संवाद आणि राजनैतिक कूटनीतिला प्राधान्य देऊन तणाव कमी करण्याचे आवाहन केले आणि या प्रदेशात शांतता, सुरक्षा आणि स्थिरता लवकरात लवकर प्रस्थापित करण्याच्या गरजेवर भर दिला आहे," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

दरम्यान, अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार,  त्यांनी इस्रायलवर सर्वात मोठा हल्ला केला आहे आणि १४ महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केले. इराणी क्षेपणास्त्रे हैफा आणि तेल अवीवमधील लष्करी आणि निवासी ठिकाणांवर पडली आहेत.

दुसरीकडे, अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर इराणने प्रतिक्रिया दिली. आम्ही अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना घाबरणार नाही. त्यांच्या प्रत्येक हल्ल्याला योग्य उत्तर दिले जाईल, असं इराणच्या लष्करी प्रमुखांनी म्हटलं.
 

Web Title: PM Modi has spoken to Iranian President regarding Iran attack