'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 17:04 IST2025-11-02T17:03:13+5:302025-11-02T17:04:17+5:30
PM Modi Bihar Election: 'देशाची सुरक्षा दलं विजय मिळवतात, तेव्हा विरोधक त्यांच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.'

'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
PM Modi Bihar Election: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरा येथील जाहीर सभेतून काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) वर तीव्र प्रहार केला. त्यांनी म्हटले की, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशामुळे देशाचा आत्मविश्वास वाढला, मात्र काँग्रेस आणि त्यांचे सहयोगी पक्ष अस्वस्थ झाले.
स्फोट पाकिस्तानात, झोप उडाली काँग्रेसची
पंतप्रधान मोदी म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानमध्ये झाले, पण काँग्रेसच्या शाही घराण्याची रात्रीची झोप उडाली. पाकिस्तान आणि काँग्रेसचे नामदार आजही ऑपरेशन सिंदूरच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. जेव्हा देशाची सुरक्षा दलं विजय मिळवतात, तेव्हा विरोधक त्यांच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात त्यामुळे देशाची प्रतिमा खराब होते,” अशी टीका पंतप्रधानांनी केली.
Watch LIVE: PM Shri @narendramodi addresses public rally in Arrah, Bihar. https://t.co/SH8LFMKEhf
— BJP (@BJP4India) November 2, 2025
महाआघाडीत मोठा तणाव
मोदींनी दावा केला की, "बिहारमधील महाआघाडी (RJD–काँग्रेस–इतर) मध्ये मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारावरून प्रचंड मतभेद आहेत. नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेच्या आधी दरवाजे बंद करून मोठा ‘राजकीय व्यवहार’ झाला. काँग्रेस राजदच्या नेत्याला मुख्यमंत्री चेहरा घोषित करू इच्छित नव्हती, पण दबावाखाली ते मान्य करावे लागले. जर निवडणुकीपूर्वीच एवढे वाद आहेत, तर निवडणुकीनंतर काय होईल?'' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
जंगलराज विरुद्ध सुशासन
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात राजदच्या सत्ताकाळाची तुलना सध्याच्या एनडीए सरकारशी केली. ते म्हणाले, “राजदच्या काळाला ‘जंगलराज’ म्हटले जायचे, जे क्रूरता, बंदूकशाही, अंधश्रद्धा आणि भ्रष्टाचाराचे प्रतीक होते. मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि एनडीए सरकारने बिहारला त्या अंधारातून बाहेर काढले. बिहारला पुन्हा जुन्या अराजकतेत नेऊ देऊ नका. आजचा बिहार विकास आणि सुशासनाच्या मार्गावर आहे."
विरोधक घुसखोरांना संरक्षण देतात
पंतप्रधान मोदींनी आरोप केला की, “बिहारच्या संसाधनांवर बिहारच्या लोकांचा अधिकार असावा, पण काही पक्ष त्यावर बाहेरील लोकांचा कब्जा करून देतात. जे घुसखोरांचे रक्षण करतात, ते बिहारसाठी धोकादायक आहेत. जे पक्ष पूर्वी उद्योग बंद करत होते, ते आता नवीन उद्योग आणतील का? गुंतवणूकदार ‘लालटेन’ (राजदचे चिन्ह) आणि ‘लाल झेंडा’ (भाकपा-मालेचे चिन्ह) पाहून घाबरतात. बिहारमध्ये उद्योग आणि रोजगार फक्त एनडीएच देऊ शकते.”