पंधरा लाख न दिल्यानं पंतप्रधान मोदी, शहांविरोधात फसवणुकीची तक्रार; खटला चालणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 04:14 PM2020-02-04T16:14:16+5:302020-02-04T16:15:59+5:30

रांचीतल्या जिल्हा न्यायालयात सुनावणीला सुरुवात

PM Modi Amit Shah face charges of cheating dishonesty in Ranchi court for not fulfilling Rs 15 lakh promise | पंधरा लाख न दिल्यानं पंतप्रधान मोदी, शहांविरोधात फसवणुकीची तक्रार; खटला चालणार

पंधरा लाख न दिल्यानं पंतप्रधान मोदी, शहांविरोधात फसवणुकीची तक्रार; खटला चालणार

Next

रांची: पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांनी फसवणूक केल्याचा आरोप करत एका व्यक्तीनं न्यायालयात धाव घेतली आहे. रांचीतल्या जिल्हा न्यायालयात या प्रकरणात सुनावणीला सुरुवात झाली आहे. उच्च न्यायालयातले वकील एच. के. सिंह यांनी मोदी आणि शहांविरोधात तक्रार दाखल केली आहे. सत्तेत आल्यावर प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख जमा करण्याचं आश्वासन देऊन दोघांनी देशवासीयांची फसवणूक केल्याचा सिंह यांचा आरोप आहे. 

मोदी, शहांच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ४१५, ४२० अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. कालपासून जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. मोदी, शहांनी देशाची फसवणूक केल्याचा आरोप करताना वकील एच. के. सिंह यांनी अमित शहांच्या सुधारित नागरिकत्व कायद्यावरील (सीएए) विधानांचा दाखला दिला. '२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात देशवासीयांना सीएए लागू करण्याचं वचन दिलं होतं. त्यामुळेच आम्ही निवडून आल्यावर सीएए लागू केल्याचं शहा सांगतात. शहा सीएएचं आश्वासन पूर्ण करू शकतात. मग जाहीरनाम्यातल्या १५ लाखांचं वचन का पूर्ण करू शकत नाहीत?,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ मार्चला होणार आहे. 

आश्वासनांची पूर्तता न करणं म्हणजे देशवासीयांची फसवणूक असल्याचं सिंह म्हणाले. 'मोदी, शहांसोबतच भाजपाच्या इतर नेत्यांनीदेखील देशवासीयांना अनेक आश्वासनं दिली. मात्र त्यांची पूर्तता झाली नाही. भाजपा सीएएचं आश्वासन पूर्ण करू शकते. मग १५ लाखांचं वचन का पूर्ण करू शकत नाही? हा भाजपाचा दुटप्पीपणा नाही का?,' असे प्रश्न सिंह यांनी विचारले. सिंह यांनी दाखल केलेली तक्रार म्हणजे पब्लिसिटी स्टंट असल्याचं प्रत्युत्तर भाजपाचे प्रवक्ते प्रतुल शाहदेव यांनी दिलं. सहा वर्षांनंतर दाखल करण्यात आलेली तक्रार केवळ प्रसिद्धीसाठी करण्यात आल्याचं शाहदेव म्हणाले.
 

Web Title: PM Modi Amit Shah face charges of cheating dishonesty in Ranchi court for not fulfilling Rs 15 lakh promise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.