हातगाड्यावर विमान अन्..! 'त्या 'कार्टूनचा उल्लेख करत पीएम मोदींची काँग्रेसवर बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 19:05 IST2025-02-04T19:03:02+5:302025-02-04T19:05:10+5:30
'तत्कालीन काँग्रेस सरकार 21 व्या शतकाच्या गप्पा करायचे, पण 20 व्या शतकाच्या गरजाही पूर्ण करू शकले नाही.'

हातगाड्यावर विमान अन्..! 'त्या 'कार्टूनचा उल्लेख करत पीएम मोदींची काँग्रेसवर बोचरी टीका
PM Narendra Modi in Parliament : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला मंगळवारी (4 फेब्रुवारी 2025) उत्तर दिले. यावेळी त्यांनी सभागृहात राजीव गांधींचे नाव न घेता, त्यांच्या सरकारचा उल्लेख करताना काँग्रेसची खिल्ली उडवली. ते म्हणाले की, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात काँग्रेस 21 व्या शतकाच्या गप्पा करायचे, पण 20 व्या शतकाच्या गरजाही पूर्ण करू शकले नाही.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'एक पंतप्रधान वारंवार 21वे शतक-21वे शतक म्हणायचे. ही त्यांची सवयच बनली होती. व्यंगचित्रकार आरके लक्ष्मण यांनी टाईम्स ऑफ इंडियामध्ये एक अप्रतिम व्यंगचित्र काढले होते. त्यात एक विमान आहे, एक पायलट आहे, विमानात काही प्रवासी बसलेत, पण ते विमान उडत नाहीये, तर हातगाड्यावरुन 21 व्या शतकाकडे नेले जात आहे. त्यावेळी हा विनोद वाटत होता, पण नंतर हा खरा ठरला. तत्कालीन पंतप्रधान जमिनीच्या वास्तवापासून किती डिस्कनेक्ट होते, हे त्या व्यंगचित्रातून दाखवले गेले. तेव्हा फक्त 21 व्या शतकाच्या गप्पा मारल्या जायच्या, पण 20 व्या शतकाच्या गरजाही पूर्ण करू शकले नाही', अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.
RK Laxman's cartoon mentioned by PM @narendramodi in his Lok Sabha speech today.
— The Indian Index (@Indian_Index) February 4, 2025
(THE TIMES OF INDIA / © BENNETT, COLEMAN & CO. LTD) pic.twitter.com/xPNNV1hQyn
'गेल्या दहा वर्षांत मला सर्व काही तपशीलवार पाहण्याची संधी मिळाली, तेव्हा मला खूप वेदना होतात. आपला देश 40-50 वर्षे मागे आहे. हे काम 40-50 वर्षांपूर्वी व्हायला हवे होते, पण झाले नाही. त्यामुळेच 2014 साली मला देशातील जनतेने सेवेची संधी दिली. आमच्या सरकारने तरुणांवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केले, त्यांच्या आकांक्षांवर भर दिला आणि त्यांच्यासाठी अधिकाधिक संधी निर्माण केल्या. आम्ही अनेक क्षेत्रे खुली केली, ज्यामुळे तरुण आपली क्षमता दाखवू शकले. अंतराळ क्षेत्र खुले केले, संरक्षण क्षेत्र खुले केले, नवनिर्मितीला चालना देण्यासाठी अनेक नवीन योजनांना आकार दिला,' असंही मोदी यावेळी म्हणाले.
PM Shri @narendramodi’s reply to the Motion of Thanks on the President's address in Lok Sabha. https://t.co/4biKGhqHoP
— BJP (@BJP4India) February 4, 2025
राजीव गांधींचा 'मिस्टर क्लीन' उल्लेख
पीएम मोदी पुढे म्हणतात, टमिस्टर क्लीन म्हणून ओळखले जाणारे एक पंतप्रधान होते. त्यांनी सार्वजनिक मंचावर एक मुद्दा उपस्थित केला होता की, जेव्हा दिल्लीतून एक रुपया पाठवला की, जनतेपर्यंत फक्त 15 पैसे पोहोचतात. त्यावेळी पंचायत ते संसदेपर्यंत एकाच पक्षाची सत्ता होती. 85 पैसे कुठे जायचे, हे सर्वसामान्यांना सहज समजू शकत होते. देशाने आम्हाला संधी दिली, आम्ही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. आमचे मॉडेल बचत आणि विकासाचे आहे. आम्ही जनधन, आधारद्वारे थेट हस्तांतरण सुरू केले. आमच्या कार्यकाळात आम्ही 40 लाख कोटी रुपये थेट जनतेच्या खात्यात जमा केले. पूर्वी वृत्तपत्रांतील मथळे घोटाळे आणि भ्रष्टाचाराशी संबंधित असायचे. गेल्या 10 वर्षात घोटाळे न झाल्यामुळे देशातील लाखो कोटी रुपये वाचले असून, ते जनतेच्या सेवेत वापरले जात आहेत. आम्ही उचललेल्या विविध पावलांमुळे लाखो आणि करोडो रुपयांची बचत झाली, तो पैसा आम्ही देशाच्या उभारणीसाठी वापरला, असा दावाही मोदींनी यावेळी केला.ट