नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 11:24 IST2025-07-12T11:24:30+5:302025-07-12T11:24:55+5:30

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान-समर्थित दहशतवादी संघटना पुन्हा एकदा भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत.

Plan to shake India through Nepal, big plan of Jaish and Army revealed | नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान-समर्थित दहशतवादी संघटना पुन्हा एकदा भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. नेपाळच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबासारख्या संघटना भारतावर हल्ला करण्यासाठी नेपाळची भूमी वापरू शकतात. भारताने नुकत्याच 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी लॉन्चपॅड्स उद्ध्वस्त केल्यानंतर हे विधान समोर आले आहे.

नेपाळच्या राष्ट्रपतींच्या सल्लागारांकडून गंभीर चिंता व्यक्त!
काठमांडूमधील 'दक्षिण आशियातील दहशतवाद: प्रादेशिक शांतता आणि सुरक्षेचे आव्हान' या विषयावरील कार्यक्रमात नेपाळचे राष्ट्रपतींचे सल्लागार सुनील बहादूर थापा यांनी हे वक्तव्य केले. हा कार्यक्रम नेपाळ इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशन अँड एंगेजमेंटने आयोजित केला होता.

खुली सीमा बनली चिंतेची बाब
नेपाळ आणि भारतादरम्यानची खुली सीमा आणि व्हिसा-मुक्त व्यवस्था ही देखील चिंतेची मुख्य बाब बनली आहे. थापा यांच्या मते, दहशतवादी याच व्यवस्थेचा फायदा घेऊन भारतात प्रवेश करू शकतात. नेपाळचे खासदार शिशिर खनाल यांनी पहलगाम हल्ल्याचा संदर्भ देत म्हटले की, आता भारत आणि नेपाळला एकत्र येऊन सीमा व्यवस्थापन अधिक मजबूत करावे लागेल. त्यांनी हाय-टेक पाळत तंत्रज्ञान, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि संयुक्त दहशतवादविरोधी कारवाई करण्याची गरज सुचवली.

फक्त भारतालाच नाही, नेपाळलाही फटका बसतोय!
नेपाळचे माजी संरक्षण मंत्री मिनेंद्र रिजाल यांनी सांगितले की, पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा दिल्याने केवळ भारतालाच नाही, तर नेपाळला आणि स्वतः पाकिस्तानलाही नुकसान सहन करावे लागत आहे. दहशतवादी हल्ल्यांचा थेट परिणाम नेपाळवरही होतो, असे ते म्हणाले. पहलगाम हल्ल्यात एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला, हे त्याचेच एक उदाहरण आहे.

नेपाळमध्ये यापूर्वीही दिसले आहेत दहशतवादी कनेक्शन
नेपाळच्या भूमीवर दहशतवादाशी संबंधित अनेक जुनी प्रकरणेही समोर आली आहेत. 'द वीक'च्या बातमीनुसार, २०१७ मध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्याला सोनौली सीमेवर एसएसबीने अटक केली होती. १९९९ मध्ये काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या 'आयसी ८१४' विमानाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. १८ मे २०२५ रोजी लष्कर-ए-तैयबाच्या नेपाळ मॉड्यूलच्या प्रमुखाची पाकिस्तानच्या सिंध प्रांतात हत्या करण्यात आली होती. या सर्व घटनांनी भारत-नेपाळ सीमेवरील सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

Web Title: Plan to shake India through Nepal, big plan of Jaish and Army revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.