गुरुग्राममध्ये पिटबुल कुत्र्याचा महिलेवर जीवघेणा हल्ला; डोक्यात घुसवले दात अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 21:55 IST2022-08-11T21:55:05+5:302022-08-11T21:55:39+5:30
गुरुग्राममध्ये पिटबुल कुत्र्याने एका महिलेवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.

गुरुग्राममध्ये पिटबुल कुत्र्याचा महिलेवर जीवघेणा हल्ला; डोक्यात घुसवले दात अन्..
गुरुग्राम: हरियाणातील गुरुग्राममध्ये पिटबुल कुत्र्याने एका महिलेवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने महिलेचा आरडाओरडा ऐकून घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांनी तिला पिटबुलच्या जबड्यातून वाचवले. सध्या पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण गुरुग्रामच्या सिव्हिल लाईन भागातील आहे. गुरुवारी सकाळी 7.30 वाजता मुन्नी नावाची महिला ड्युटीवर जात होती. यावेळी वाटेत एक पिटबुल कुत्रा फिरत होता. त्याने अचानक महिलेवर मागून हल्ला केला. कुत्र्याने महिलेचे डोके त्याच्या जबड्यात पकडले, यामुळे तिला रक्तस्त्राव झाला. मात्र महिलेचा आरडाओरडा ऐकून लोकांनी तिला वाचवण्यासाठी धाव घेतली. महिलेच्या डोक्याला गंभीर जखमा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पिटबुलने महिलेच्या डोक्यात दात घुसवल्याचे दिसत आहे.
स्थानिकांमध्ये तीव्र संताप
प्राथमिक उपचारानंतर महिलेला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सध्या महिलेवर शस्त्रक्रिया सुरू आहे. ती मृत्यूशी लढत आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पिटबुल कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. कुत्र्याच्या मालकाने महिलेवर जाणूनबुजून कुत्रा सोडल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेबाबत स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
यापूर्वी अशीच घटना घडली होती
गेल्या महिन्यात लखनौमध्ये असाच एक प्रकार समोर आला होता. लखनौमध्ये एका पाळीव कुत्र्याने आपल्या वृद्ध मालकिनीवर हल्ला करुन जीव घेतला होता. पाळीव पिटबुल दीड तास महिलेच्या शरीराचे लचके तोडत होता. या प्रकरणी महापालिकेच्या सहसंचालकाने पिटबुल कुत्र्याला ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते.