भारताचा मास्टरस्ट्रोक! फ्रान्सकडून राफेल घेणार अन् स्वदेशी पिनाका देणार; अमेरिकन HIMARS पेक्षा सरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 13:41 IST2026-02-17T13:40:37+5:302026-02-17T13:41:23+5:30

Pinaka Rocket System: फ्रान्सची भारताच्या ‘पिनाका’ रॉकेट प्रणालीवर नजर; भारतीय संरक्षण निर्यातीसाठी मोठी संधी!

Pinaka Rocket System: India's masterstroke! Will buy Rafale from France and give indigenous Pinaka; Better than American HIMARS | भारताचा मास्टरस्ट्रोक! फ्रान्सकडून राफेल घेणार अन् स्वदेशी पिनाका देणार; अमेरिकन HIMARS पेक्षा सरस

भारताचा मास्टरस्ट्रोक! फ्रान्सकडून राफेल घेणार अन् स्वदेशी पिनाका देणार; अमेरिकन HIMARS पेक्षा सरस

Pinaka Rocket System: भारत आता केवळ संरक्षण साहित्य खरेदी करणारा देश राहिलेला नाही, तर स्वदेशी वैज्ञानिकांनी विकसित केलेल्या अत्याधुनिक शस्त्रप्रणालींचा जागतिक बाजारात निर्यातदार म्हणून उदयास आला आहे. भारतीय संरक्षण क्षमतेची दखल आता केवळ विकसनशील देशच नव्हे, तर विकसित राष्ट्रेही घेत आहेत. भारत लहान देशांना शस्त्र पुरवठा करतच होता, मात्र आता फ्रान्सने भारताच्या स्वदेशी ‘पिनाका’ मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर प्रणालीत (MBRL) रस दाखवला आहे.

राफेल कराराच्या पार्श्वभूमीवर पिनाकावर चर्चा

भारत आणि फ्रान्स यांच्यात सध्या 4.5+ पिढीतील 114 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी चर्चा सुरू आहे. सुमारे 3.25 लाख कोटी रुपयांची ही संभाव्य डील भारताच्या संरक्षण खरेदी इतिहासातील सर्वात मोठी मानली जात आहे. संरक्षण खरेदी परिषदेकडून या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून, आता कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची अंतिम मंजुरी अपेक्षित आहे. दरम्यान, फ्रान्सने भारताच्या पिनाका रॉकेट प्रणालीची सखोल पाहणी सुरू केली असून, यासाठी फ्रान्सचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर आले होते.

पिनाका रॉकेट प्रणालीवर फ्रान्सची नजर

‘पिनाका’ ही भारताची स्वदेशी मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर प्रणाली असून, ती अमेरिकेच्या HIMARS आणि रशियाच्या Tornado-S सारख्या प्रगत प्रणालींना थेट टक्कर देते. अहवालांनुसार, पिनाकाच्या खरेदीसाठी भारत-फ्रान्स दरम्यान उच्च पातळीवर चर्चा सुरू आहे. जर हा करार प्रत्यक्षात आला, तर तो भारताच्या संरक्षण निर्यातीसाठी मैलाचा दगड ठरेल. फ्रान्स हा नाटोचा सदस्य, जागतिक शस्त्रबाजारातील मोठा खेळाडू आणि विकसित देश असल्याने, त्याने भारतीय प्रणालीवर विश्वास दाखवणे ही भारताच्या संरक्षण क्षमतेची मोठी आंतरराष्ट्रीय मान्यता असेल.

चर्चा कुठवर पोहोचल्या?

फ्रान्स सध्या आपल्या सैन्यातील जुन्या M-270 रॉकेट प्रणालीचे आधुनिकीकरण करण्याच्या तयारीत आहे. नवीन रॉकेट प्रणाली विकसित करण्याचे काम सुरू असले तरी त्याला वेळ लागणार आहे. त्यामुळे तातडीच्या गरजांसाठी पिनाका हा एक प्रभावी पर्याय म्हणून पाहिला जात आहे. अलीकडेच पिनाकाच्या प्रगत आवृत्तीची यशस्वी चाचणी घेण्यात आली असून, फ्रेंच शिष्टमंडळाने लॉन्चर, दारुगोळा आणि प्रणालीच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन केले आहे.

पिनाकाची ताकद आणि वैशिष्ट्ये

पिनाका ही गेली सुमारे तीन दशके भारतीय सैन्यात कार्यरत असलेली प्रणाली असून, कारगिल युद्धात तिने आपली प्रभावी क्षमता सिद्ध केली आहे. आर्मेनिया हा देश आधीच पिनाका प्रणालीचा वापर करत आहे.

सध्याच्या आवृत्तीची मारक क्षमता : 75 ते 90 किमी

पिनाका Mk-3 ची मारक क्षमता : 120 ते 130 किमी

पिनाका Mk-4 (विकासाधीन) : 300 किमी पर्यंत मारक क्षमता

किमतीत मोठा फरक, स्वदेशी ताकद

एका पिनाका प्रणालीची किंमत अंदाजे 2.3 कोटी रुपये असून, त्याच श्रेणीतील अमेरिकन HIMARS प्रणालीची किंमत सुमारे 19.5 कोटी रुपये आहे. म्हणजेच किमतीत जवळपास आठ पट फरक आहे.

पिनाका प्रणाली पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असून, कोणत्याही घटकासाठी भारताला परदेशावर अवलंबून राहावे लागत नाही.

पिनाकाची प्रमुख वैशिष्ट्ये

अत्यंत जलद फायरिंग क्षमता

डोंगराळ, उंच आणि कठीण भूप्रदेशात प्रभावी

एक लॉन्चर 44 सेकंदांत 12 रॉकेट्स डागू शकतो

एका बॅटरीत 6 लॉन्चर; एका मिनिटात 72 रॉकेट्स

सुमारे 1 चौ. किमी क्षेत्र उद्ध्वस्त करण्याची क्षमता

मल्टी-डायरेक्शन फायरिंग सुविधा

‘शूट अँड स्कूट’ क्षमता- फायर करून त्वरित स्थान बदलणे

चार ऑपरेशन मोड्स : ऑटोनॉमस, स्टँडअलोन, रिमोट आणि मॅन्युअल

मैदान, वाळवंट आणि पर्वतीय भागात समान प्रभाव

पिनाका सर्वोत्तम आहे का?

कोणतीही लष्करी प्रणाली पूर्णपणे “सर्वोत्तम” ठरवणे हे गरज आणि रणनितीवर अवलंबून असते. अमेरिकन HIMARS ची रेंज जास्त असली, तरी पिनाकाची जलद आणि प्रचंड फायरपॉवर, किफायतशीर किंमत आणि सर्व भूप्रदेशातील कार्यक्षमता यामुळे ती आपल्या श्रेणीत जगातील अव्वल पाच प्रणालींमध्ये गणली जाते. कमी वेळेत मोठ्या क्षेत्रावर मारा करण्याची क्षमता ही पिनाकाची सर्वात मोठी ताकद मानली जाते.

Web Title : भारत का मास्टरस्ट्रोक: फ्रांस से राफेल, दुनिया को पिनाका!

Web Summary : राफेल सौदे के बीच भारत फ्रांस को पिनाका रॉकेट प्रणाली निर्यात करने पर विचार कर रहा है। HIMARS के समकक्ष, पिनाका लागत प्रभावी और सभी इलाकों में सक्षम है। फ्रांस अपने आधुनिकीकरण कार्यक्रम के लिए पिनाका का मूल्यांकन कर रहा है, जो भारतीय रक्षा निर्यात के लिए एक मील का पत्थर साबित हो सकता है।

Web Title : India's Masterstroke: Rafale from France, Pinaka for the World!

Web Summary : India eyes exporting its Pinaka rocket system to France amidst Rafale deal talks. Pinaka, comparable to HIMARS, offers cost-effectiveness and all-terrain capability. France evaluates Pinaka for its modernization program, potentially marking a milestone for Indian defense exports.