कोण आहेत भाजप खासदार फांगनोन कोन्याक? ज्यांनी राहुल गांधींवर केलाय गैरवर्तनाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 20:43 IST2024-12-19T20:38:58+5:302024-12-19T20:43:46+5:30
Phangnon Konyak : या संपूर्ण धक्काबुक्कीसाठी भाजप राहुल गांधींना जबाबदार धरत आहे.

कोण आहेत भाजप खासदार फांगनोन कोन्याक? ज्यांनी राहुल गांधींवर केलाय गैरवर्तनाचा आरोप
Phangnon Konyak : नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून आधीच वातावरण तापलेलं असताना आज संसदेच्या मकर गेटजवळ धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. काँग्रेसचे खासदार आणि भाजपचे खासदार समोरसमोर आले. यावेळी धक्काबुक्की झाली. या धक्काबु्क्कीत भाजपचे दोन खासदार जखमी झाले.
या संपूर्ण धक्काबुक्कीसाठी भाजप राहुल गांधींना जबाबदार धरत आहे. दरम्यान, या घटनेवेळी नागालँडच्या भाजप खासदार फांगनोन कोन्याक या सुद्धा उपस्थित होत्या. आंदोलनादरम्यान राहुल गांधी हे आपल्याजवळ आले आणि त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे राहुल गांधींच्या वागण्याने मला अस्वस्थ वाटले, असा आरोप खासदार फांगनोन कोन्याक यांनी केला आहे.
फांगनोन कोन्याक म्हणाल्या की, संसद परिसरात मकर गेटच्या पायऱ्यांखाली शांततापूर्ण आंदोलन सुरू होते. यावेळी राहुल गांधी माझ्या जवळ आले. यामुळे मला खूप अस्वस्थ वाटू लागले. ते माझ्यावर ओरडले. मी स्वतःचा बचाव करू शकलो नाही असे नाही. पण, त्यांच्या वागण्याने मी खूप नाराज झाले. कोणत्याही महिलेला, विशेषत: नागालँडमधून येणाऱ्या महिलेला अशी वागणूक देऊ नये. मला सभापतींचे संरक्षण हवे आहे.
दरम्यान, याप्रकरणी भाजप खासदार फांगनोन कोन्याक यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांच्याकडे तक्रार केली. त्या म्हणाल्या, राहुल गांधींनी माझ्याशी गैरवर्तन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरून मी काँग्रेसचा निषेध करत होते. त्यानंतर राहुल गांधी माझ्या अगदी जवळ आले. अचानक ते आरडाओरड करू लागले. आज जे काही घडले ते अतिशय दुःखद आहे. राहुल गांधी यांनी माझी प्रतिष्ठा आणि स्वाभिमान दुखावला आहे. मी सभागृहात सुरक्षेची मागणी करते.
#WATCH | Delhi: BJP Rajya Sabha MP Phangnon Konyak says, "LoP Rahul Gandhi came close... I did not like it and he started shouting...Whatever happened today is very sad, this should not happen. We did not like the way they threatened...I have also complained to the Chairman..." https://t.co/d83HUvwQFlpic.twitter.com/oGtaja66le
— ANI (@ANI) December 19, 2024
कोण आहेत फांगनोन कोन्याक?
फांगनोन कोन्याक या नागालँडमधून राज्यसभेवर निवडून आलेल्या पहिल्या महिला सदस्य आहेत. फांगनोन कोन्याक या नागालँडमधील भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. मार्च 2022 मध्ये त्या नागालँडमधून राज्यसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या. त्यांचे शालेय शिक्षण दिमापूर येथील होली क्रॉस उच्च माध्यमिक विद्यालयातून झाले. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या दौलत राम महाविद्यालयातून इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.