मंत्रालयातल्या निवृत्त कर्मचाऱ्याने सायबर फसवणुकीमुळे संपवले जीवन; आरोपीला गुजरातमधून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 19:59 IST2025-04-15T19:54:26+5:302025-04-15T19:59:08+5:30
बेळगावातील वृद्ध जोडप्याच्या आत्महत्येप्रकरणी गुजरातमधील एका व्यक्तीला अटक केली आहे.

मंत्रालयातल्या निवृत्त कर्मचाऱ्याने सायबर फसवणुकीमुळे संपवले जीवन; आरोपीला गुजरातमधून अटक
Karnataka Crime: कर्नाटकच्या बेळगावमध्ये एका वृद्ध जोडप्याने सायरब फ्रॉडच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं प्रकरण गेल्या महिन्यात समोर आलं होतं. महत्त्वाची बाब म्हणजे आत्महत्या करणारी व्यक्ती महाराष्ट्र शासनामध्ये माजी अधिकारी होती. मुंबई क्राइम ब्रँचचा अधिकारी असल्याचे सांगून आरोपींनी वृद्धाला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळली होती. या त्रासाला कंटाळून वृद्ध जोडप्याने आत्महत्या केली होती. आता पोलिसांनी याप्रकरणातील आरोपीला गुजरातमधून अटक केली आहे.
निवृत्त सरकारी कर्मचारी ८३ वर्षीय डिएगो सँटन नाझरेथ आणि त्यांची पत्नी फ्लावियाना यांचे मृतदेह बेळगावी येथील खानापूर येथील त्यांच्या राहत्या घरी आढळून आले. निवृत्त दाम्पत्य पूर्वी महाराष्ट्र मंत्रालयात कार्यरत होते. डिएगो नाझरेथ आणि त्यांची पत्नी हे गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुन्हेगारांच्या धमक्यांमुळे हैराण झाले होते. नैराश्यात गेलेल्या दोघांनीही स्वतःला संपवले. आता नाझरेथ यांना धमकावणाऱ्याला कर्नाटकपोलिसांनी अटक केली आहे.
"गेल्या महिन्यात बेळगाव येथे एका वृद्ध जोडप्याच्या आत्महत्येप्रकरणी गुजरातमधील एका व्यक्तीला अटक केली आहे. चिराग जीवराज भाई लक्कड असे आरोपीचे नाव असून तो सुरतचा रहिवासी आहे," अशी माहिती सोमवारी कर्नाटक पोलिसांनी दिली. २७ मार्च रोजी डिएगो , नाझरेथ आणि त्यांची पत्नी फ्लेव्हियाना नाझरेथ हे त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळले होते. मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकारी असल्याचे सांगून आमची फसवणूक केल्याचे नाझरेथ यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं होतं.
आरोपी चिरागने डिएगो यांना तुमच्या नावाने सिम कार्ड खरेदी केले असून त्याचा गैरवापर बेकायदेशीर कामांसाठी केला जात आहे, अशी माहिती दिली होती. त्यानंतर व्हिडीओ कॉल करून जोडप्याला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. तुमचा मोबाईल आयडी आणि कागदपत्रे काही गुन्हेगारी कृत्यांमध्ये वापरली गेली आहेत. त्यामुळे तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील, असं चिरागने वृद्ध दाम्पत्याला सांगितले. घाबरलेल्या दाम्पत्याने ही रक्कम आरोपींना दिली. मात्र त्यानंतर धमक्या आणि पैशाची मागणी वाढत गेली. नाझरेथ यांनी अनेक राज्यांमधील २२ बँक खात्यांमध्ये ५९.६३ लाख रुपये ट्रान्सफर केले.
"लक्कडकडे बालाजी इंडस्ट्रीजच्या बँक खात्याशी जोडलेले सिम कार्ड होते आणि तेथून नेट बँकिंगद्वारे पैसे इतर दोन खात्यांमध्ये ट्रान्सफर केले गेले. तो एका मोठ्या साखळीचा भाग आहे आणि कमिशनसाठी काम करत होता. चौकशीनंतर, आम्ही त्याला न्यायालयीन कोठडीत सोपवले आहे," असे पोलिसांनी सांगितले.
नाझरेथ हे मुंबईतील सचिवालयात काम करत होते आणि निवृत्तीनंतर ते बेळगावातील बिडी गावात स्थलांतरित झाले होते. फ्लावियाना यांचा मृतदेह घरात तर डिएगो यांचा मृतदेह घराबाहेरील नाल्यात सापडला होता. दोघांनीही विषारी गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले होते. गोळ्या खाल्ल्यानंतर डिएगो यांनी गळा चिरण्याचा प्रयत्न केला आणि नंतर पाण्याच्या टाकीत उडी मारली.